घाटबोरी/कोहळीतील दारुमुक्तीमुळे महिलांमध्ये समाधान

0
15

गोंदिया,दि.१० : सडक/अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या घाटबोरी/कोहळी गावातील महिला व पोलीस पाटील श्री.लंजे यांच्या प्रयत्नांमधून २८ फेब्रुवारी २०१७ रोजी दारुबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी ग्रामसभा आयोजित करुन दारुबंदीबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. गावातील अवैध दारुविक्री करणाऱ्या लोकांना पोलीसांनी निर्वाणीचा इशारा दिला व ३ मार्च २०१७ पासून हे गाव पूर्णपणे दारुमुक्त झाले आहे. त्यामुळे गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
घाटबोरी/कोहळी हे गाव दारुबंदी केल्यामुळे दारुबंदी समितीतील महिला व पोलीस पाटील यांनी ३ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाबळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचा सत्कार केला. दारुबंदी करण्यासाठी ठाणेदार केशव वाबळे, पोलीस पाटील श्री.लंजे, दारुबंदी समिती अध्यक्ष श्रीमती डोंगरवार, सरपंच श्रीमती नागदिवे यांनी विशेष प्रयत्न केले. या गावचा दारुबंदीबाबतचा आदर्श ठेवून इतर गावांनीही असाच उपक्रम राबविण्याबाबत ठाणेदार केशव वाबळे यांनी आवाहन केले आहे.