सिरोंचा तालुक्यातील पाच रेतीघाटांचे परवाने रद्द-अपर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
8

गडचिरोली,दि.१०: राज्यभर गाजत असलेल्या सिरोंचा येथील गोदावरी नदीपात्रातील रेती तस्करीप्रकरणाची गंभीर दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच रेतीघाटांचे परवाने रद्द केले आहेत. यामुळे रेती कंत्राटदारांसह त्यांची पाठराखण करणाऱ्या मंडळींची भंबेरी उडाली आहे.
परवाने रद्द झालेल्या रेतीघाटांमध्ये गोदावरी नदीतील कोटामाल, वडदम, मद्दिकुंठा, नगरम व नगरम-२ या पाच रेतीघाटांचा समावेश आहे. या पाच रेती घाटांसह अंकिसा माल येथील घाटातूनही नियमभंग करुन वाळूचे उत्खनन करुन ती तेलंगणात नेली जात होती. गेल्या काही महिन्यांपासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात गडचिरोली येथील पत्रकारांनी थेट नदीघाटावर जाऊन पाहणी करुन रेतीचे अवैध उत्खनन होत असून, राज्य शासनाचा महसूल बुडत असल्याचा ऑखो देखा वृत्तांत प्रकाशित केला होता. वृत्तपत्रे व वाहिन्यांनी रेती तस्करीचा पंचनामा केल्यानंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री.राजा यांनी महसूल विभागाच्या सहकार्याने जवळपास ७८ ट्रक व ४ जेसीबी ताब्यात घेतल्या होत्या. या प्रकरणी २७ जणाविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. शिवाय ५ मार्चला मुख्य आरोपी व्यंकटेश्वर येनगंटी यालाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी काही मंडळींकडून पोलिसांवर प्रचंड दबावही आला होता. परंतु दबाव झुगारुन श्री.राजा यांनी कारवाई केली. यामुळे राज्य सरकारचे रेती तस्करीमुळे भविष्यात होणारे मोठे नुकसान टळले. पोलिस विभागाच्या फौजदारी कारवाईनंतर अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी उपरोक्त पाच रेती घाटांचे परवाने रद्द केले आहेत.