बँक व्यवस्थापक कार्यशाळा संपन्न

0
11

गोंदिया,दि.१५ : दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व नगरपरिषद गोंदिया यांच्या संयुक्त वतीने बँक व्यवस्थापक कार्यशाळेचे उदघाटन नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक टी.एम.चिंधालोरे, राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान मुंबईचे राजेंद्र बरडे, नगर परिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती एस.एस.बिसेन व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल सोसे यांनी केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानामध्ये माविमने नगरपरिषद गोंदियाच्या शहरी भागात २५३ महिला स्वयंसहायता गटांची निर्मिती करुन २७०० गरीब गरजू महिलांचे संघटन निर्माण करण्यात आलेले आहे. यात ८२ महिला स्वयंसहायता गटांनी ६० लक्ष रुपयांची बँक कर्ज उचल केलेली आहे असे सांगितले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्याची माहिती विशद केली.
सामाजिक विकास नगरपरिषद गोंदियाचे व्यवस्थापक श्री.डी.बनकर यांनी सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत भूमिकेची मांडणी केली. कार्यशाळेमध्ये टी.एम.चिंधालोरे व निरज जागरे यांनी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत स्थापित झालेल्या महिला स्वयंसहायता गटांना मार्गदर्शन व बँक कर्जाचा लाभ मिळवून देण्यासाठी उपस्थितीत सर्व बँक व्यवस्थापक व विभागाचे प्रमुख यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन माविमचे सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती मोनिता चौधरी यांनी मानले.