विद्यापीठ प्रशासनाचे मौन सीताराम येचुरींचा कार्यक्रम स्थगित

0
8

नागपूर दि.१७: विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.कम्युनिस्ट पक्षाचे नेते व खासदार सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम तडकाफडकी स्थगित केल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात खळबळ माजली आहे. परवानगीच्या घोळामुळे कार्यक्रम स्थगित झाला की संघ परिवाराच्या दबावातून हे पाऊल उचलण्यात आले, याबाबत चर्चांना उधाण आले.कार्यक्रम स्थगित करण्याबाबत कुलगुरूंसह प्रशासनाने ठोस कारण दिलेले नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. दरम्यान, आंबेडकर विचारसरणीच्या नेत्यांनी व विचारकांनी कुलगुरूंची भेट घेऊन कार्यक्रम स्थगित न करण्याचे आवाहन केले.
गुरुवारी दुपारी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. हा कार्यक्रम रद्द का केला, असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. हा कार्यक्रम रद्द करण्यामागे कुणाचाही दबाव नसून अंतर्गत प्रशासकीय कारणांमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. लवकरच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेदेखील कुलगुरूंनी सांगितले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. कुलगुरूंनी नेमके कारण स्पष्ट करायला हवे. हा कार्यक्रम व्हायलाच हवा, अशी मागणी डॉ. मनोहर यांनी केली. यावेळी आंबेडकरी चळवळीचे ताराचंद्र खांडेकर, नागेश चौधरी, प्रा.प्रकाश खरात, अमन कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.
अभाविप किंवा संघ परिवाराच्या कुठल्याही संघटनेकडून विद्यापीठाला याबाबत निवेदनदेखील प्राप्त झाले नाही. नितीन राऊत यांनीदेखील नागपुरात असे कुणी करणार नाही, असे मत व्यक्त केले. जर संघाचा काहीही संबंध नाही, तर मग कार्यक्रम स्थगित करण्यामागचे नेमके कारण सांगण्यास टाळाटाळ का करण्यात येत आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.