अत्यल्प दराने तेंदूविक्री करणाऱ्या ग्रामसभांचे विक्री करारनामे रद्द करा- जयश्री वेळदा

0
8

गडचिरोली,,दि.२३: लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही दलालांनी ग्रामसभांच्या पुढाऱ्यांना हाताशी घेऊन योग्य विक्री प्रक्रिया न राबविता अत्यल्प दराने तेंदूपाने खरेदीचे करारनामे केले आहेत. यामुळे ग्रामसभांचे व पर्यायाने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा ग्रामसभांचे विक्री करारनामे रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री वेळदा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जयश्री वेळदा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेंदू हंगाम हे जिल्ह्यातील गरीब जनतेच्या मुख्य रोजगाराचे साधन आहे. पेसा व वनाधिकार कायद्यामुळे आता ग्रामसभाही मोठ्या प्रमाणावर तेंदूपानांची विक्री करीत आहेत. परंतु काही दलाल ग्रामसभांच्या पुढाऱ्यांशी संधान साधून अत्यल्प दराने तेंदूपानांची विक्री करायला लावत आहेत. यामुळे ग्रामसभांचे मोठे नुकसान होत आहे.
एकीकडे वनविभागाने विक्री केलेल्या तेंदू युनिटला चार ते पाच पट दर मागील पाच वर्षांपेक्षा अधिक मिळाला आहे. असे असताना ग्रामसभांनी विक्री केलेल्या तेंदू युनिटना अत्यल्प दर मिळत आहे. अहेरी, धानोरा व कोरची येथे १२ हजार रुपये, एटापल्ली व भामरागड येथे १४ हजार रुपये प्रतीगोणी(१ हजार पुडे) दर मिळणे अपेक्षित होते. अशावेळी केवळ ६ हजार ते ९९०० रुपये दराने तेंदूगोणी विकण्यात आल्या. या व्यवहारात ग्रामसभांचे काही पुढारी व विशेषत: ग्रामपंचायतींच्या सचिवांचा मोठा सहभाग आहे, असा आरोप जयश्री वेळदा यांनी केला आहे.