अनुदान जाहीर करा, तरच उत्तरपत्रिका तपासू

0
6

गोंदिया,दि.२४:’कायम’ हा शब्द वगळलेल्या तारखेपासून उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना १00 टक्के अनुदान जाहीर करावे, बिनपगारी शिक्षकांना पगार सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीने केली आहे.संतप्त शिक्षकांनी अनुदान जाहीर करा, तरच इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासू, अशी कठोर भूमिका घेतली.याबाबतचे निवेदन गुरुवारी (दि.२३) जिल्हाधिकार्‍यांसह माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहे.
शासनाने २८ फेब्रुवारी २0१४ रोजी ‘कायम’ हा शब्द वगळला. मात्र, अनुदान जाहीर केले नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आजही बिनपगारी राबत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन केवळ आश्‍वासने देऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोपही शिक्षकांनी केला.तत्पूर्वी शिक्षकांनी येथील सुभाष बगीच्यात येऊन निर्णय घेतला.समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी प्रा. के. बी. बोरकर, प्रा. डी. बी. दीक्षित, प्रा. एम. एल. बोपचे, प्रा.एस. डब्ल्यू. कुरेशी, एस. एम. लंजे, प्रा. प्रकाश मेहर, प्रा. के. डी. बोपचे, एस. के. मेश्राम, सी. एस. बोपचे, एन. डी. ठाकरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.