न.प. उपाध्यक्ष शर्मा यांचा स्वच्छतेसाठी संकल्प

0
15

गोंदिया दि. 6: शहर स्वच्छतेला घेवून अनेक वेळा यापूर्वी पालिका प्रशासनाला जागविण्यात आले. मात्र, त्याचा लाभ झाला नाही. त्यातच पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा यांनी शहरवासीयांसाठी नेहमी त्रासदायक ठरणार्‍या रेल्वे अंडरग्राऊंड मार्गाचा कायापालट करण्याचा संकल्प घेतला असून, मागील आठवड्याभरापासून अंडरग्राऊंड परिसराचा मार्ग स्वच्छ करण्यात येत आहे. त्यातच ३ एप्रिल रोजी कामगारांसोबत स्वत: उभे राहून उपाध्यक्ष शर्मा यांनी स्वच्छता अभियानाला गती दिली.
गोंदिया नगरपालिकेत २१ प्रभाग आहेत. विशेष म्हणजे, शहरातील मुख्य चौक, मुख्य बाजार परिसर आदी ठिकाणी आजही अस्वच्छता आहे. शहर स्वच्छतेला घेवून अनेक वेळा प्रसारमाध्यमांनी शहर स्वच्छतेचे वाभाळे काढले. मात्र, त्यापासून पालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनी काहीच बोध घेतला नव्हता. जानेवारी महिन्यात नगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर नवनियुक्त नगरपरिषद उपाध्यक्षांनी शहर स्वच्छतेला महत्त्व देत सफाई कामगारांची बैठक घेवून स्वच्छता अभियान संपूर्ण शहरात राबविण्याचे सक्त निर्देश दिले व त्याचे पालनही आता होऊ लागले आहे. त्यातच शहरातील एकमेव अंडरग्राऊंड मार्ग हा पावसाळ्याच्या दिवसांत शहरवासीयांसाठी वाहतूक करताना त्रासदायक ठरत असे. पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावर सुमारे २ ते ४ फुटापर्यंत पाणी येत असल्याने वाहतूक करताना वाहतुकीसाठी हा मार्ग बंद राहत असे. ही बाब हेरून शर्मा यांनी या परिसराला स्वच्छ करण्याचा विडा मागील पंधरवाड्यापासून उचलला आहे.