समाजात सामाजिक समता रुजवावी – जिल्हाधिकारी काळे

0
12

गोंदिया,दि.८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसुत्रीतून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्रिसुत्रीचा अवलंब करुन प्रत्येकाने समाजात सामाजिक समता रुजविण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.८ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी श्री.काळे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. सप्ताहाचे उदघाटक म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री.दाभाडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.काळे पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी समाजात समतेचा संदेश रुजविला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला समतेची वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे असे सांगून ते पुढे म्हणाले स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व अभ्यासूवृत्तीने मन लावून अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ.पुलकुंडवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय ठरवून शिक्षण घ्यावे. तरच स्वत:चे व सोबतच देशाचे नाव उज्वल करता येईल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलभूत अधिकाराची जाणीव असायला पाहिजे. जीवनात प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. प्रत्येक नागरिकामध्ये धीटपणा असायला हवा. पूर्वी जाती, पंथ, भाषा यामध्ये समाज विखुरलेला होता. ब्रिटीश राजवटीला उलथवून लावण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली. समाजामध्ये जाती, धर्म न पाळता, एक मानव समाज व भारतीय समाज म्हणून जगावे. आपण सर्व समान आहोत ही प्रत्येकाची एकमेकाप्रती वागणूक असायला हवी. बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगितले.
श्री.धारगावे म्हणाले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. व्यक्तीमत्वाची परीक्षा जातीवरुन न करता त्याच्या गुणवत्तेवरुन करावी. बाबासाहेबांची अभ्यासूवृत्ती विद्यार्थ्यांनी अंगीकारली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निव्वळ संख्या वाढू नये तर त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री.दाभाडे यांनीही मार्गग्दर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यामिनी लिल्हारे, रश्मी कामत व अशोक वाकले यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून श्री.वानखेडे म्हणाले, अनुसूचित जाती व सर्वप्रकारचे पिडीत, शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत यासाठी राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रदिप ढवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकेश केदार, श्री.खोडे, श्री.कळमकर, श्री.खरोले व लक्ष्मण खेडकर यांनी परिश्रम घेतले. ०००००