उष्माघात, स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

0
17

भंडारा,दि.21 : सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात व स्वाईन फ्लूपासून स्वत:चा बचाव करावा असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांनी केले आहे. उष्माघात व स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघात व स्वाईन फ्ल्यूसाठी लागणारा औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनीता बढे, डॉ.चाचरकर, डॉ.रवी कापगते, डॉ.श्रीकांत आंबेकर, रेडक्रॉस सोसायटी आयएमए, फॉग्सी, आयपीए, निमा, फुटपाथ युनियन, आॅटो रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये ‘इन्फ्यूएंझा एच १ एन १’ च्या रुग्णामध्ये वाढ झालेली असून या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये इन्फ्यूएंझा प्रतिबंध व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वाईन फ्लू असेल या संशयाने तपासण्यात आवे व उपचार करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे दोन विलगीकरण कक्ष असून एक सामान्य रुग्णालय येथे तर दुसरा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये सदर आजाराची तपासणी व उपचार केले जातात. जिल्ह्यात एकुण ८ आयसीयु बेड व ७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. या आजारावर उपचाराकरिता लागणारी ‘आॅसेलॅमीवीट’ औषधी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

संशयीत स्वाईन फ्लू रुग्णांची लक्षणे ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी आहेत. उपरोक्त लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, पोष्टीक आहार, धुम्रपान टाळणे, पुरेशी विश्रांती व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

उष्णतेचा जास्त संबंध आल्याने शरीराचे तापमान नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उद्भवणारा जीवघेणा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा मजुरीवर फार वेळ काम करणे, फार वेळ उन्हात फिरणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे व घट्ट कपड्यांचा वापर या बाबी उष्माघातासाठी कारणीभूत ठरतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा राबविला असून अहमदाबादमध्ये याची प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. एप्रिल, मे व जून या महिन्यात ४५ डिग्री पेक्षा जास्त तापमान असते. त्यामुळे या तीन महिन्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कामाशिवाय उन्हात जावू नये, १२ ते ५ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे, निंबूपाणी, नारळपाणी, ताक, आंब्याचे पन्हे आदी भरपूर प्रमाणात प्यावे, घर थंड ठेवण्यासाठी कुलर, फॅनचा वापर करावा, थंड पाण्याने आंघोळ करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत आदी सुचना देण्यात आल्या.