अन् ‘तिला’ मिळाले नवजीवन

0
12

देवरी,दि.28 : हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असलेल्या शेतकरी पत्नीला पैशाअभावी उपचार करता आले नाही. मात्र सत्य सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून सदर महिलेचा उपचार करवून ‘तिला’ नवजीवन मिळवून दिले. प्रीती गजानन शिवणकर रा. शिरपूर (ता. देवरी) असे त्या महिलेचे नाव असून आता ती गुण्यागोविंदाने आपल्या कुटुंबासह संसार करीत आहे.

प्रीतीचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. चांगले सहजीवन सुरू असतानाच पहिल्या बाळाच्या प्रसूतीवेळेस तिच्या हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असल्याचे कळले. मुलगा लहान असताना काहीच करता आले नाही. मात्र नंतर उपचारासाठी नागपुरातील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये भटकंती झाली. सर्वच ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च सांगण्यात आला. पती शेतकरी असल्याने एवढा खर्च झेपावत नव्हता.

अशातच सत्य सामाजिक संस्था आरोग्याविषयी काम करते व संस्थेची आपल्याला काही मदत होवू शकते, ही बाब लोकांच्या माध्यमातून पती गजानन यांना कळली. त्यांनी विलंब न करता संस्थेचे कार्यकारी संचालक देवेंद्र गणवीर यांना संपर्क साधला व आपली परिस्थिती सांगितली. गणवीर यांनी नागपूरच्या (कामठी) आशा हॉस्पिटलमध्ये डॉ. सौरभ अग्रवाल यांच्याशी संपर्क करून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक लांजे यांना प्रीतीला दाखविले. लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल अन्यथा दुसरा वॉलसुद्धा खराब होवू शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

मात्र, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशाची अडचण होती. गणवीर मागील पाच वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची कल्पना होती. त्यांनी गजाजन यांंना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले व स्वत: नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. यानंतर नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात प्रीतीची फाईल जमा केली. आठ दिवसांनी फाईल पास झाली व एक लाख २५ हजार रूपये शस्त्रक्रियेसाठी मंजूर झाले. प्रीती १४ एप्रिलला आशा हॉस्पिटल नागपूर येथे भरती झाली व दुसऱ्या दिवसी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ती स्वगावी कुुटंबासह आनंदी असून तिने हॉस्पिटलचे संचालक डॉ. सौरभ अग्रवाल, सर्जन डॉ. विवेक लांजे, सत्य संस्थेचे देवेंद्र गणवीर, समन्वयक राहुल राऊत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.