जिल्ह्यातील ४१८ तलावाची निवड गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत

0
14

गोंदिया,दि.९ : गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. पुर्वजांनी बांधलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. साचलेला गाळ हा सुपीक असून शेतकरी बांधवांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारङ्क या योजनेतून तलावातील गाळ शेतीत टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यात येणार आहे.यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत ८ तालुक्यातील ४१८ तलावांची निवड गाळ काढण्यासाठी करण्यात आली.त्याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यातील ५० तलावाचेंही गाळ काढण्याचे ठरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ९ मे रोजी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या बाबत आयोजित सभेत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता पथाडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारङ्क या योजनेविषयी माहिती दिली. पथाडे यांनी जिल्हा परिषदेकडे १०० हेक्टरचे १४२१ माजी मालगुजारी तलाव असून गोंदिया पाटबंधारे विभागाकडे १०० हेक्टरवरील ३८ तलाव व स्थानिक स्तर यांच्याकडे २५० हेक्टर पर्यंतचे २९ तलाव असल्याची माहिती दिली. सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक वाय.एस.वालदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, सिध्दार्थ भंडारे, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे सर्व उपअभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.