जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन नवजात बालकांचा मृत्यू

0
11

गडचिरोली,दि.२०: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दहा तासांत दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.अहेरी येथील रिजवाना आरिफ शेख व चंद्रपूर जिल्ह्यातील मालडोंगरी येथील दुर्गा समर्थ या दोन महिलांना प्रसूतिकरिता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे दोघींच्या नवजात बालकांचा मृत्यू झाला. रिजवाना शेख या महिलेला काल १९ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या वेदना वाढल्यामुळे प्रसूतीची वेळ जवळ आली होती. त्यामुळे रिजवानाच्या कुटुंबीयांनी डॉ.नंदकुमार माळाकोळीकर यांना माहिती दिली. परंतु डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य न बघता प्रसूतीकडे कानाडोळा केला. अखेर संध्याकाळी रिजवाना वेदनांनी विव्हळत असताना डॉ.माळाकोळीकर यांनी तिची प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ पोटातच दगावल्याचे निदर्शनास आले. डॉ.माळाकोळीकर यांनी वेळीच प्रसूती केली असती तर बाळ सुखरुप बाहेर आले असते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावला, असा आरोप रिजवानाच्या नातेवाईकांनी केला.

दुसरी घटना दुर्गा समर्थ या महिलेच्या बाबतीत घडली. दुर्गा समर्थ हिलादेखील कालच प्रसूतिकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रसूतिनंतर काही क्षणातच तिचेही नवजात बाळ दगावले. या दोन्ही घटनांबाबत नागरिकांनी रुग्णालयाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.