तेंदू कंत्राटदारांकडून पोलिसांनी जप्त केलेली ती रक्कम आमचीच-मजुरांचा दावा

0
11

अहेरी,दि.२६: अहेरी पोलिसांनी बोटलाचेरु येथील दास्तान डेपोतून जप्त केलेले १ कोटी १ लाख रुपये वेलगूर, किष्टापूर ग्रामपंचायतींतर्गत १६ गावांतील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची असून, ती तत्काळ बोटलाचेररु येथील तेंदूपत्ता संकलन कार्यालयाला परत करावी, अशी मागणी १२ गावांतील तेंदूपत्ता मजूरांनी अहेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

अहेरी पोलिसांनी २२ मेच्या मध्यरात्री आलापल्ली येथून पहाडिया तुळशीराम तांपला(३५), रवी मलय्या तनकम(४५), नागराज समय्या पुट्टा(३७)या तीन तेंदू कंत्राटदारांना चारचाकी वाहनातून नक्षल पत्रकासह अटक केली. त्यांच्याकडून ७५ लाख मिळाले असून, ही रक्कम नक्षल्यांना नेऊन देणार होते, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बोटलाचेरु येथील दास्तान डेपोतून १ कोटी १ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. मात्र, आज १२ गावांतील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांनी वेलगुर व क्रिष्टापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन ती रक्कम मजुरांची असल्याचे सांगितले. .यासंदर्भात त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंम्पे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए.राजा यांना निवेदनही दिले. सरपंच व मजुरांनी सांगितले की, यंदा किष्टापूर येथील तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट नागराज समय्या पुट्टा रा. वरंगल यांना देण्यात आले होते. या ग्रामपंचायतींतर्गत किष्टापूर वेल, मैलाराम, वेलगूर टोला, बोटलाचेरु, तानबोडी, रामय्यापेठा, मद्दीगुडम या महसुली गावांचा समावेश असून तेथील तेंदू मजूरांनी १२ मे ते २० मे पर्यंत तेंदूपत्ता संकलन केले होते. तेंदूपत्ता संकलनाच्या मजुरीपोटी त्यांना ५८ लाख ८५ हजार ३४४.५७ रुपये देणे घ्यावयाचे होते, तर वेलगूर ग्रामपंचायतींतर्गत नवेगाव, तोंदेल, रोलचिल या गावातील तेंदूपत्ता मजुरांनी १३ मे ते २२ मेपर्यंत तेंदू संकलन केले होते. संबंधित कंत्राटदारांनी तेंदू संकलनाची ५६ लाख ९ हजार १९१.५० रुपये २२ मे रोजी देण्याची कबुली मजुरांना दिली होती. मात्र तत्पूर्वीच २१ मेच्या रात्री बोटलाचेरु येथील दास्तान डेपोतून पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. रक्कम जप्त करताना पोलिसांनी पोलिस पाटील, सरपंच व प्रतिष्ठीत व्यक्ती यांना सूचना देउुन पंचनामा करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी तसे न करता परस्पर ती रक्कम जप्त केली,असा आरोप तेंदूपत्ता मजूर तसेच गावकऱ्यानी पत्रकार परिषदेत केला.

विशेष म्हणजे पोलिसांनी २१ मे रोजी रक्कम जप्त केली. परंतु  ती २२ मेच्या कार्यवाहीत दाखविण्यात आली. संपूर्ण रक्कम मजुरांना देण्यासाठी असून, ती परत न मिळाल्यास पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याशी चर्चा करुन पुढील भूमिका ठरवू, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला पत्रकर परीषदेला पं.स.सदस्या गीता चालूरकर, वेलगूरच्या सरपंच कुसूम दुधी, उपसरपंच शुभांगी झोडे, ग्रा. पं. सदस्य रक्षा जंगमवार, किष्टापूर ग्रा. पं. चे उपसरपंच मल्लेश तोटावार, मैलारामचे पोलिस पाटील विठ्ठल गलतुलवार, मारोती ओडगवार, तानबोडीचे राजे शेंडे, विनाय बोरुले, आत्माराम गदेकार, आदील पठाण, आशन्ना दुधी, किष्टापूर ग्रा. पं. सदस्य काशिनाथ दल्ला, भूमा गावडे, किष्टापूर पोलिस पाटील महेश अको, भगवान आत्राम, सुरेश मडावी, श्रीहरी आत्राम, विकास मडावी, विजय मडावी, नारायण मडावी, लक्ष्मण दब्बा, मसाजी मडावी, अंजनाताई पेंदाम, सुरेश येरमे, राजू येरमे, मारोती ओंडगेवार, मधुकर मादावार, रेणूका सडमेक, प्रेमिला सडमेक, मधूकर सडमेक, करण तोरे, सतीश तोर्रम, रहिमून अमिद शेख आदींसह बहूसंख्य तेंदूपत्ता मजूर व किष्टापूर, वेलगूर ग्रामपंचायतींतर्गत गावातील नागरीक उपस्थित होते.