वित्‍त विभाग हा शासनाच्‍या सर्व विभागांचे हृदय – सुधीर मुनगंटीवार

0
21

सहाय्यक लेखाधिकारी संघटनेचे स्‍नेह संमेलन नागपूरात संपन्‍न

नागपूर,दि.10-वित्‍त विभाग हा शासनाच्‍या सर्व विभागांचे हृदय आहे. आपण सारे अधिकारी आणि कर्मचारी या हृदयासाठी काम करतो. वित्‍त विभाग वेगाने पुढे जावा ही आमची भावना आहे. त्‍या माध्‍यमातुन राज्‍याची सुध्‍दा प्रगती होईल. महाराष्‍ट्र वित्‍त लेखा सेवा गट-ब सहाय्यक लेखाधिकारी संघटनेच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍याबाबत शासन नेहमीच सकारात्‍मक भुमीका घेईल व सहकार्य करेल असे प्रतिपादन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 10 जून रोजी नागपूर येथे महाराष्‍ट्र वित्‍त लेखा सेवा गट-ब सहाय्यक लेखाधिकारी संघटनेच्‍या वतीने आयोजित स्‍नेह सम्‍मेलनात ते बोलत होते. यावेळी लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक श्री. नकवी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी श्री. का. पि. शिंदे, संघटनेचे अध्‍यक्ष शिवाजी शेलार, सरचिटणीस प्रफुल्‍ल वडेट्टीवार, रमेश गिरी, प्रकाश वानखेडे, मनोज खरबडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, राजपत्रित दर्जा मिळण्‍याबाबतच्‍या संघटनेच्‍या मागणीच्‍या पुर्ततेबाबत वित्‍त विभागाच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांनी सकारात्‍मक भुमीका घेतली. अशीच सकारात्‍मक भुमीका सर्व अधिका-यांनी लोकहिताच्‍या कामासंदर्भात घेण्‍याची आवश्‍यकता आहे. आम्‍हाला काय मिळाले यापेक्षा आम्‍ही समाजाला काय दिले ही भावना महत्‍वाची आहे. या भावनेतुनच सर्व अधिका-यांनी काम करावे व समाजहित साधावे, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. संघटनेच्‍या पदाधिका-यांनी जे प्रेम व्‍यक्‍त केले ते प्रेरणादायी व आनंददायी असल्‍याचे वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.यावेळी संघटनेच्‍या वतीने वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाला महाराष्‍ट्र वित्‍त लेखा सेवा गट-ब सहाय्यक लेखाधिकारी संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.