विकासामध्ये महिलांची महत्वाची भूमिका-उषाताई मेंढे

0
18

गोंदिया,दि.१५ : केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये महिलांचे मोठे योगदान असून देशाच्या सकारात्मक विकासामध्ये महिलांची महत्वाची भूमिका असल्याचे मत गोंदिया जिल्हा परिषदेच्या सौ. उषाताई मेंढे यांनी कुडवा येथे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित विशेष प्रचार अभियानात बोलतांना व्यक्त केले.
गोंदियापासून जवळच असलेल्या कुडवा येथे क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने सरकारच्या विविध योजनांच्या प्रचारार्थ विशेष प्रचार अभियानाचे आयोजन विशाल लॉन येथे आज दिनांक १५ जून २०१७ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. गोंदिया पंचायत समितीच्या सभापती सौ. माधूरी हरीणखेडे, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख , गट विकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, कुडवाचे सरपंच शैलेंद्र वासनिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या खुशबू टेंभरे, पंचायत समिती सदस्या किर्ती पटले, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार , विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक राणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनवने यांनी केले. विशेष प्रचार अभियानाच्या निमित्ताने कुडवा येथे सकाळी जनजागृती रॅली सुध्दा काढण्यात आली. या रॅलीत कुडव्याचे संरपंच शैलेद्र वासनिक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले. या रॅलीत महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
विशेष प्रचार अभियानाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. विभागाच्या वतीने प्रदर्शनी लावण्यात आली होती. यामध्ये बँक ऑफ इंडिया, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, स्वच्छ भारत मिशन आदिनी आपल्या योजनांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.