दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
11

गडचिरोली,दि.१९: : छत्तीसगडमधील जहाल नक्षलवादी पवन वेलादी यास अटक केल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला नक्षलींनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सोनी दसरु कोवासे रा.आंबेली ता.बैरमगड, जि.बिजापूर व अन्य एका बालिकेचा त्यात समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी कोवासे ही सांड्रा दलममध्ये तर दुसरी बालिका ही परसेगड दलममध्ये कार्यरत होती. नक्षल बालिकेस बालकल्याण समितीपुढे हजर केले असता बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, नक्षल संघटनेचा डीव्हीसी दिलिप, परसेगड दलम कमांडर मंगी पुनेम, डीव्हीसी पवन उर्फ सोमा वेलादी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३४ व बाल संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ८३ नुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपी डीव्हीसी पवन यास अटक करण्यात आली असून, त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नक्षलवादी हे बालकांना बळजबरीने पळवून नेतात व लहान मुलांचे शोषण करुन त्यांना दलममध्ये काम करण्यास भाग पाडतात. यावरुन नक्षलवादी हे बालकांच्या मानवाधिकाराचे कशाप्रकारे उल्लंघन करतात, हे पुन्हा एकदा या घटनेने सिद्ध झाले आहे, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा लाहेरी परिसरात नक्षलवाद्यांनी शाळेतून तीन मुलींना बळजबरीने पळवून नेले होते व त्यांना नक्षल दलममध्ये भरती करुन घेतले होते.