पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज- राजकुमार बडोले

0
21

धम्मकुटी येथे ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
गोंदिया,दि.१ : कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विषारी किरणे पृथ्वीवर येत आहेत. उत्तर धृवावरचा बर्फ वितळताना दिसतो आहे. या सर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. पृथ्वीचे संरक्षण न झाल्यास पृथ्वी नष्ट होण्याची भिती वाटत आहे. बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज १ जुलै रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा/पळसगाव जवळील सम्यक संकल्प धम्मकुटी येथे ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रदिपकुमार बडगे, भंते संघधातू, तहसिलदार विठ्ठल परळीकर, जैवविविधता समिती डव्वाचे अध्यक्ष विलास चव्हाण, माजी जि.प.सदस्य श्रीमती किरण गावराणे, पं.स.सदस्य जोशीला जोशी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, पुष्पमाला बडोले, विठ्ठल साखरे, चेतन वडगाये यांची मंचावर उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, यंत्रणा आणि संस्थांनी जिल्ह्याला दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकाभिमुख झाला पाहिजे. पिवळ्या पळसाची लागवड पुढील वर्षीपासून रस्त्याच्या दुतर्फा केल्यास सौंदर्यात भर पडण्यास मदत होईल. आपला जिल्हा भाग्यशाली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव असून ५० टक्के भूभाग हा वनाने आच्छादीत आहे. जीवसृष्टीचा विनाश थांबविणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड केल्यास त्याची जोपासणा केल्यास ही वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होईल.
वन समित्यांनी राजकारण न करता वनहक्क पट्टयांचे वाटप करावे असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात वनपर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. पर्यावरणातून पर्यटन आणि त्यामधून समृध्दी कशी येईल यादृष्टीने काम झाले पाहिजे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन त्याला ट्रीगार्ड लावून वृक्षाचे संगोपन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी १५ लाख खड्डे करण्यात आले आहे. जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पळसांची झाडे आहेत. त्यापैकी पिवळ्या पळसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत तरतूद करण्यात आली असून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून २ लाख पिवळ्या पळसाची रोपटे तयार करण्यात येतील. परदेशी वृक्षाची लागवड न करता केवळ देशी वृक्षांची लागवड राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच होत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.मोहिते म्हणाले, आपण सर्वजन सुजान नागरिक आहोत. वृक्षाचे महत्व आपणाला माहित आहे. प्रत्येकाला कोणते ना कोणतेतरी फळ नक्कीच आवडते. आज आपण आपल्या आजोबांनी वृक्ष लावल्यामुळेच आज त्या वृक्षांची फळे खायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
श्री.बडगे म्हणाले, राज्याचे वनाच्छादीत क्षेत्र ३५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर ती वृक्ष जगविणेही महत्वाचे आहे. लावलेल्या वृक्षांचा उपयोग भविष्यात निश्चितच होईल. आज पर्यावरण संकटात आहे. पाणी सुध्दा सुरक्षीत राहिलेले नाही. पिण्याचे पाणी सुध्दा विकत घ्यावे लागेल हा विचार कोणी केला नसेल. ३५० वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरेङ्क हे सांगून पर्यावरणाचे महत्व तेव्हाच विषद केले आहे.
प्रास्ताविकातून माहिती देतांना श्री.युवराज म्हणाले, यावर्षी १ ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्याला १२ लाख ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात १५ लाख ९७ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत विविध यंत्रणा, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था सहभागी आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ४०० रोपांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अन्य मान्यवरांनी सम्यक संकल्प धम्मकुटीच्या परिसरात वृक्ष लागवड केली. डव्वा व परिसरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.राठोड, एस.के.खांडेकर, पी.व्ही.फुले, डी.डी.नागपुरे, युनूस पठाण, पी.एम.राघोर्ते, एस.आर.गडवार, आर.आर.काळबांधे, ए.बी.बडगे, जी.डब्ल्यू मोहतूरे, विलास गौतम, के.एस.भोयर, डी.डी.माहुरे, एस.सी.बघेले, व्ही.एस.नागरीकर, डी.पी.मुंगूलमारे, महेश तिरपुडे, व्ही.पी.बडोले, सुरेश मेंढे तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे सी.बी.लांडगे व शितल काईट यांनी परिश्रम घेतले. संचालन अरविंद बडगे यांनी केले. उपस्थितांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.राठोड यांनी मानले.