कृषि क्षेत्रातील क्रांती ही वसंतराव नाईकांमुळे – पालकमंत्री बडोले

0
17
????????????????????????????????????

गोंदिया,दि.१ : शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतूनच माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. ते खऱ्या अर्थाने शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी कृषि विद्यापीठाची स्थापना केली. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. कृषि क्षेत्रात झालेली क्रांती ही वसंतराव नाईकांमुळेच आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती आज १ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषि दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, देशाच्या संदर्भात विचार केल्यास मागील दोन वर्षात कृषि क्षेत्रातील उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. स्वामीनाथन आणि वर्गीस कुरियन यांनी केलेल्या संशोधनामुळे कृषि व दुग्ध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. शेती, पाणी व उत्पादित मालाची योग्य बांधणी न केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. धानाची उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी चांगले बीज शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दयावेत. सेंद्रीय धान उत्पादनाची चळवळ जिल्ह्यात उभी राहिल्यास आपण भक्कमपणे सेंद्रीय धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या कृषिशी संबंधित अनेक योजना आहेत असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जिल्ह्यात वन, पाणी मुबलक असतांना आपण मानव विकास निर्देशांकात कमी आहोत. आपण मागे का राहिलो याचा विचार करणे गरजेचे आहे. येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एक हजार तलावातील गाळ काढून त्यांची सिंचन क्षमता वाढविण्यात येईल. त्यामुळे कृषि क्षेत्रात बदल झालेला दिसेल. शेतकऱ्यांनी मत्स्य, दूध, फळ व भाजीपाला पिकांकडे वळले पाहिजे त्यामुळे आर्थिकस्थिती सुधारण्यास मदत होईल. रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्याची कामे घेण्यात यावी, त्यामुळे शेतातील उत्पादीत माल शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचविणे सहज शक्य होईल असे त्यांनी सांगितले.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी तांत्रिक पध्दतीने शेती करावी यासाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असतांना आपण उत्पादनात मागे आहोत. शेतकऱ्यांनी आता शेतीपुरक व्यवसाय म्हणून कुक्कूटपालन, मत्स्यपालन व दुग्धव्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषि विभागाने योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवावी. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल असे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, दुष्काळातून हरितक्रांतीकडे नेण्यास वसंतराव नाईकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. देश आज महासत्तेकडे वाटचाल करीत असतांना शेतीचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. आज शेतीचा खर्च वाढला असून उत्पन्न कमी होत आहे. सेंद्रीय शेतीची चळवळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने सेंद्रीय पध्दतीने धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे आहे असे सांगितले.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, कृषि विकासाच्या दृष्टीने नियोजनाचा अभाव आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या दृष्टीने येत्या तीन वर्षात तलावांचे खोलीकरण व कालव्यांची दुरुस्ती होणार असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषि विभागाच्या योजना पोहोचविण्याचे काम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे करावे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम कृषि विभागाने करावे असे त्यांनी सांगितले श्रीमती दसरे म्हणाल्या, शेतकऱ्यांना वेळोवेळी चांगले बी-बियाणे मिळाले पाहिजे याकडे कृषि विभागाचे लक्ष दयावे. चांगले बियाणे असल्यास पिकाची उत्पादन क्षमता निश्चितच वाढेल. शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या कोणत्याही योजना घेतांना अडचणी येणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्या म्हणाल्या.
श्री.कटरे यावेळी म्हणाले, शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचे काम वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीच्या माध्यमातून केले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या. शेतीची उत्पादन क्षमता वाढीसाठी आज शेतीमध्ये अमुलाग्र परिवर्तन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदर्श शेतकरी देवाजी बनकर, योगेश चौधरी, सुनिल दाते, जगदिश बघेले, तुकाराम भोयर, कमलेश रहांगडाले, मनीष वर्मा, ऋषी टेंभरे, योगेंद्र बिसेन यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सेंद्रीय तांदूळाची पिशवी देवून सत्कार करण्यात आला. कृषि पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, आत्माचे उपसंचालक श्री.सराफ, कृषि अधिकारी श्री.निमजे यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जिल्ह्यातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी मानले.