नागपूर जिल्ह्यात 16 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य

0
20
चला, हरीत महाराष्ट्र घडवूया- पालकमंत्री
नागपूर दि. 1, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरीत महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करत आहे. नागपूर जिल्ह्यात येत्या सात दिवसांमध्ये 16 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी वनविभगाच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी, कॉलेज युवक –युवती, विविध सामाजिक संस्थांनी हिरीरीने भाग घेत येत्या तीन वर्षात हरीत महाराष्ट्र घडवू, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. राज्य राखीव पोलीस बल गट आणि
वन विभागातर्फे  वन महोत्सव 2017 आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते  बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रा.आ. अनिल सोले, आ. समीर मेघे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीभगवान, मुख्य वन संरक्षक संजीव गौर तसेच गिरीश गांधी उपस्थित होते.येत्या तीन वर्षात महाराष्ट्राला हरीत राज्य बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे. त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली असून, पूर्व विदर्भात प्रा. आमदार अनिल सोले यांनी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातून त्यांच्याच हस्ते गेल्या आठवड्यात वृक्षदिंडी काढली. तर गेल्या 25 वर्षांपासून गिरीश गांधी वनराईच्या माध्यमातून या क्षेत्रात भरीव काम करत आहेत. राज्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी ग्रामीण भागातून सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी घरात नवजात बालकाचा जन्म झाल्याच्या निमित्ताने एक वृक्ष लागवड करायला हवी. त्या बाळाबरोबर वृक्षाचेही संगोपन होईल. वृक्षसंगोपनाला एक भावनिक आधार राहील. परिणामी, राज्याला हरीत राष्ट्र बनविणे सहजसाध्य होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, वृक्षसंवर्धन ही सामाजिक   चळवळ बनली पाहीजे. कोणतीही चळवळ ही सामाजिक चळवळ बनल्यास त्याची व्याप्ती वाढते. एकदा व्याप्ती वाढली म्हणजे त्याच्या यशस्वीतेची खात्री पटते.सध्या पावसाळा असून, वृक्षसंगोपनाची तितकी काळजी नाही. मात्र, पावसाळा संपल्यानंतर प्रत्येकाने एक एक वृक्ष संगोपनासाठी दत्तक घेतल्यास राज्य लवकरच बहरेल, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी आमदार प्रा. अनिल सोले, आ. समीर मेघे, गिरीश गांधी आदींची भाषणे झाली, यावेळी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) श्रीभगवान यांनी प्रास्ताविक केले. तर आभार उमेशचंद्र धोटेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय स्काऊंट्स आणि गाईडचे विद्यार्थी,राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 4 आणि नागरीक उपस्थित होते.