देवरी-आमगाव राज्यमार्ग ठरू पाहतो ‘स्वर्गाचे द्वार’

0
8

एक ट्रॉली मातीने बुजविले २ किमीचे खड्डे

साबां विभागाचा ‘भीम’ पराक्रम

सुरेश भदाडे

देवरी,२८- गेल्या काही वर्षापासून देवरी-आमगाव रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा राज्यमार्ग वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी केवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली मातीमिश्रित मुरुमाचा वापर करून दोन किलोमीटर मधील खड्डे बुजविण्याचा भीम पराक्रम या विभागाने केला आहे. परिणामी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने या राज्यमार्गावर वाहनचालकांसाठी स्वर्गाचे द्वार तर उघडण्याचे धोरण आखले नसावे ना,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सविस्तर असे की, देवरी-आमगाव राज्यमार्गावर मुल्ला ते वडेगाव या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काही चालकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागल्याचे वृत्त आहे. यंदा पावसाचे प्रमाण या भागात अत्यंत कमी असताना सुद्धा रस्त्यावर जागोजागी पाणी साचून राहत असल्याने दुचाकीस्वारासह पादचाèयांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे बंद केले आहे. परिणामी, पावसाच्या साचलेल्या पाण्याने डांबरी रस्ते खराब होत आहेत. मुल्ला ते वडेगाव दरम्यान गेल्या वर्षीपासून पडलेले खड्डे बुजविण्याचे काम विभागाने केले नसल्याचे दिसून येते. डागडुजीच्या नावाखाली कंत्राटदाराशी संगनमत करून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या तीन-चार दिवसापूर्वी देवरीच्या एका कंत्राटदाराच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचा देखावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. या कंत्राटदाराने केवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली मातीमिश्रित मुरुमाचा वापर करून दोन किलोमीटर रस्त्यातील खड्डे बुजविण्याचा भीम पराक्रम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे हा कंत्राटदार सत्ताधारी पक्षाचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाèयांचे चांगलेच फावत आहे.
या भागातील लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देवून वाहनचालकांच्या जिवाचे संरक्षण करण्याची मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर रस्त्याच्या डागडुजी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाहीची मागणी सुद्धा होत आहे.