प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले

0
24

सिरोंचा,दि.18: येथील प्राणहिता नदीत बुडालेल्या दोन्ही मुलींचे मृतदेह शोधण्यात पोलिस व आपत्ती व्यवस्थापन चमूला यश आले आहे. व्यंकटरमना सारय्या कठबंजी(११)रा.भोपालपल्ली(तेलंगणा) व सपना तिरुपती पस्तम(११)रा.बेल्लमपल्ली(तेलंगणा) अशी मृत मुलींची नावे आहेत.मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातील बेलमपल्ली येथील काही नागरिक सिरोंचा येथे आले असून, विठ्ठल मंदिरासमोरील खुल्या जागेवर झोपड्या बांधून ते भांडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या कुटुंबातील व्यंकटरमना सारय्या कठबंजी(११) व सपना तिरुपती पस्तम(११) या दोन मुली बुधवारला(दि.१६)सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्राणहिता नदीघाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र खोल पाण्यात बुडाल्याने त्या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राठोड यांनी घटनास्थळी पोहचून पोलिस जवान व आपत्ती व्यवस्थापन चमूच्या सहकार्याने शोधमोहीम सुरु केली. परंतु काल मृतदेह मिळू शकले नाही. पाणी खोल व प्रवाही असल्याने नागपूरच्या एसडीआरएफ चमूला पाचारण करण्यात आले.गुरुवारला सकाळी ६ वाजता ३० जणांची चमू सिरोंचाला पोहचली. त्यांनी लगेच शोधमोहीम राबविली. सुरुवातीला व्यंकटरमना कठबंजी हिचा मृतदेह शोधण्यात जवानांना यश आले. त्यानंतर दुपारी सपना पस्तम हिचाही मृतदेह आढळून आला, अशी माहिती गडचिरोलीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख क्रिष्णा रेड्डी यांनी दिली.