‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तक प्रकाशनाचे

0
22

नागपूर,दि.27 : लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.सामाजिक ऐक्याची संधी उपलब्ध करून दिली. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा हे लाँगमार्चच्या आंदोलनाचे देदीप्यमान वैशिष्ट्य ठरले. नामांतराचा लढा हा आंबेडकरी समाजाच्या स्वत्वसिद्धीचाच लढा होता, असा सूर उपस्थित वक्त्यांनी काढला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खांडेकर म्हणाले, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर लाँगमार्च आंदोलन झाले. जोगेंद्र कवाडे हे या आंदोलनाचे प्रतीक होते. सम्यक क्रांतीच्या विचारांना घेऊन लढा लढविण्यात आला होता. यात ‘जयभीम’ साप्ताहिकाचे कार्य महत्त्वपूर्ण राहिले. मात्र, या ऐतिहासिक लढ्याची येथील विचारवंतांनी दखल घेतली नाही, ही खंत आहे.
निमित्त होते ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तक प्रकाशनाचे. मंगळवारी सीताबर्डी येथील नेताजी मार्केट येथील रिपब्लिकन मुव्हमेंट कार्यालयात हा सोहळा आंबेडकरी विचारवंत ताराचंद खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थॉमस कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, पुस्तकाचे लेखक इ.मो. नारनवरे, गीता नारनवरे, अ‍ॅड. सुरेश घाटे व प्रकाशक नरेश वाहाणे उपस्थित होते. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तकावर भाष्य करताना डॉ. चोरमारे म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आपल्या पुस्तकात कल्पनेला कुठलाही वाव दिला नाही. नामांतराचे वास्तववादी दर्शन या पुस्तकातून घडते.अंगावर शहारे आणणारे, माणसाला अंतर्मुख करणारे असे अनेक संदर्भ या पुस्तकात आहे. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ म्हणजे परिश्रमाचे, त्यागाचे, लढाऊपणाचे व नि:स्वार्थपणाचे जिवंत चित्रण आहे.
‘लाँगमार्च’च्या आठवणींना उजाळा देत थॉमस कांबळे म्हणाले, ११ नोव्हेंबर १९७१ रोजी पवित्र दीक्षाभूमीची माती कपाळी लावून प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या नेतृत्वात लाँगमार्च निघाला तेव्हा मराठवाडा विद्यापीठास ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे’ हा एकच ध्यास होता. माझ्यासह अनेक भीमसैनिक पाऊस, चिखल तुडवित चालत होते, सहभागी होत होते. बुरशी लागलेली भाकर, नाल्याचे पाणीही त्यावेळी गोड लागले. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा या एकाच भूमिकेत सर्व जण होते.
डॉ. आगलावे म्हणाले, ‘लाँगमार्च’ हे अस्मितेचे, स्वाभिमानाचे आंदोलन होते. या आंदोलनावर पहिले पुस्तक दिल्लीच्या विजय ढेंबरे यांनी लिहिले. परंतु ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. इ.मो. नारनवरे यांनी लिहिलेले ‘लाँगमार्च जिंदाबाद’ हे पुस्तक नव्हे तर तो त्यांनी लिहिलेला इतिहास आहे. या आंदोलनाला स्वाभिमानाची किनार होती म्हणूनच ते ऐतिहासिक ठरले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र शेलार यांनी केले. संचालन भीमराव वैद्य यांनी तर आभार नरेश वाहाणे यांनी मानले.