दसरा उत्सव म्हणजे सामाजिक एक्याचे प्रतिक: राजे अम्ब्रीशराव आत्राम

0
56

आलापल्ली, २ : अहेरी येथील दसरा महोत्सव म्हणून संपूर्ण देशात सामाजिक एकोप्याचे प्रतिक आहे. या दसरा उत्सववाच्या माध्यमातून हिंदू – मुस्लिक एकत्र येत असून एकोप्याची भावना अधिक दृढ होण्यास मदत मिळत असून अहेरीचा दसरा उत्सव संपूर्ण देशात सामाजिक बांधिलकी जोपासणारा ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. जवळपास दोनशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेला अहेरीचा दसरा उत्सव महाराष्ट्रातीलच नव्हे; तर संपूर्ण देशात एक सांस्कृतिक व धार्मिक उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या महोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे राजवाडा मैदानात आयोजन करण्यात आले.

अहेरीचे पहिले राजे भुजंगराव, पहिले धर्मराव यांनी हा विजयादशमीचा उत्सव सुरू केला. पण या उत्सवाला विशाल असे लोकोत्तर रूप तत्कालीन राजे दुसरे धर्मराव महाराजांनी दिले. त्यांनी देशातील नागपूर, रायगड, उज्जैन, इंदोर येथील दसरा उत्सवाचे स्वरूप बघितले. अहेरी राजनगरीत हा उत्सव धूमधडाक्‍यात सुरू केला. तेव्हापासून पुढे राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज आणि विद्यमान राजे अम्ब्रीशराव महाराज या संस्कृतीचे जतन करीत आहेत.

गढीबाईदेवीचे महत्त्व

गडअहेरी नाल्याच्या काठावरील आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते. पूजेनंतर राजा झाडाची पाने तोडून सीमोल्लंघन झाल्याची ग्वाही देतो. नंतर गडअहेरीतील गढीबाईदेवीसमोर राजा नतमस्तक होतो. हा सर्व सोपस्कार पार पाडून राजघाटावरील समाधीसमोर राजाने माथा टेकावा, असा रिवाज आहे. त्यानंतरच पालखी राजमहालात स्थिरावते. पालखी मिरवणुकीनंतर राजा महालासमोरील भव्य पटांगणावर जमलेल्या पंचक्रोशीतील जनसमुदायाला मार्गदर्शन करतो. रात्री बाराच्या सुमारास मोठी शेकोटी पेटविली जाते. तिथे गोटूल करून प्रभागवार माडिया, गोंड समाजातील तरुणी-तरुण तालासुरात गाणी गाऊन नृत्य करतात.

पारंपरिक दसरा

पारंपरिक दसरा आजही राजनगरीत राजाच्या आशीर्वादाने उत्साहाने साजरा होतो. पालखीला टेंभ्याचाच प्रकाश मान्य असून पालखी भोई समाजातील लोकच खांद्यावर घेतात. पारंपरिक वेशभूषेत लोक नाचगाणे, नजराणे, गोटूल करतात.

उत्सवात बदल

पूर्वी दसरा दहा दिवसांचा असायचा. दहा दिवस लोक मुक्‍काम ठोकायचे. स्वत: शिधापाणी शिजवून उत्सवात सहभागी व्हायचे. आज जीवन गतिमान झाले. एका दिवसात जाणे-येणे शक्‍य झाल्याने हा फरक पडला. पूर्वी राजाला नजराणा म्हणून एक रुपया, दोन रुपये दिले जात. सर्व नजराणा एकत्र करून राजाचा स्पर्श झाला की खजिन्यात जमा होत असे. याचा उपयोग रस्ते बांधणी, शिक्षण, आरोग्य यासाठी खर्च होत असे. आज ही प्रथा बंद झाली.

राजघराण्यात शस्त्रपूजेची परंपरा

अहेरीत दसरा महोत्सवाची सुरुवात नवरात्रीच्या प्रारंभीच घटस्थापना झाल्यापासून आश्विन शुद्ध दशमीपर्यंत विद्यमान राजे सकाळ-संध्याकाळ मनोभावे घटाची पूजा करतात. या काळात महल परिसरात मोठा नगारा वाजत असतो. नगाऱ्याला नवीन चामडे चढविण्याची प्रथा आजपर्यंत कायम आहे. राजे पारंपरिक पोशाखात पालखीतून मिरवीत आलापल्ली मार्गावरील मामा तलावाचे दर्शन घेतात. तेथे शस्त्रपूजेनंतर परंपरा म्हणून एखादे कोंबडीचे लहानसे पिलू सोडले जाते. तलावाच्या पाण्यात पोहणाऱ्या पिलावर राजा बंदुकीतून नेम साधतो. पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात हिंस्र पशू होते. सामान्यांचे राजा हिंस्र पशूंचा नाश करून रक्षण करायचा. अन्यायाच्या निर्दालनासाठी शस्त्र हाती घ्यायचा. तीच कल्पना तीच धारणा या कोंबडीच्या पिलावर निशाणा साधण्यामागे आहे