जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र – जिल्हाधिकारी

0
14

भंडारा,दि. 9 :- आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखादया गोष्टीची माहिती असणे हे सुध्दा आपत्ती व्यवस्थापन आहे. खऱ्या अर्थाने जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगिततले. 9 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचा आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे औपचारिकरित्या शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त 9 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर दरम्यान जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या कलापथकाने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपत्ती ही सांगून येणारी घटना नसून त्यासाठी सदासर्वदा सजग असणे महत्वाचे आहे. आपल्याकडे साधारणत: रस्ते अपघात, दुष्काळ, पूरपरिस्थिती, आग, आजाराची साथ, चेंगराचेंगरी, अशा प्रकारच्या आपत्ती घडतात.
आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे नागरिकात जागृती करणे होय. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 155 शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सुध्दा प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेवून इतरांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताहात पथनाटय, वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आपण एखादया जीव जरी वाचवू शकलो तरी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य आपल्या हातून घडेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारा काळ हा आपत्ती व्यवस्थापनाचा काळ असून दुष्काळ, पूर व रस्ते अपघात या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.