आपत्त्ती व्यवस्थापनात प्रशासन व नागरिकांची भूमिका महत्वाची- अभिमन्यू काळे

0
22

गोंदिया,दि.१४ : कोणतीही आपत्ती वा संकट सांगून येत नाही. त्यामुळे अशा प्रसंगात कमीत कमी जिवित व वित्तीय हानी होईल यासाठी प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे. आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन व नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्ताने आयोजित कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री.काळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण जनजागृती हे महत्वाचे घटक आहे. नैसर्गीक आपत्त्तीला तोंड देण्यासाठी महसूल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून त्यांचा योग्यरितीने उपयोग करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ठाकरे म्हणाले, आपत्तीची तिव्रता ही आपत्ती आल्यावरच कळते. म्हणून आपत्तीची पूर्वतयारी व प्रशिक्षण गरजेचे आहे. आपत्तीच्या वेळेस आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्रीचा उपयोग आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी करता येईल असे ते म्हणाले.
डॉ.भूजबळ म्हणाले, पोलीस विभागातील विविध पथकांच्या माध्यमातून विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस विभाग आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. नवनविन तंत्रज्ञानाचा आपत्ती व्यवस्थापनात वापर करुन प्रशासकीय यंत्रणेला या काळात मदत मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यशाळेत अदानी प्रकल्पाचे अग्नीशमन अधिकारी त्रिलोकसिंग पांचाळ यांनी आग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय रेड क्रॉस संस्थेचे मुख्य प्रशिक्षक आशिष चव्हाण यांनी प्रथमोपचार या विषयावर माहिती दिली. उपस्थितांना आपत्ती धोक निवारणाच्या दृष्टीने प्राथमिक उपाययोजना कशाप्रकारे कराव्या तसेच उपलब्ध संसाधनाच्या आधारे आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तीला स्ट्रेचरद्वारे पुढील उपचारासाठी नेण्याची उपाययोजना, या काळातील प्रथमोपचार कशा पध्दतीने करता येईल याबाबतची विस्तृत माहिती दोघांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना दिली.
जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेत उपस्थितांचे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी काळे यांनी स्वाक्षरी करुन केली. या अभियानात उपस्थितांनी शपथ घेतली. मी आपत्तीबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही, मी पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल ओलांडणार नाही, आकाशात ढग असतांना व गडगडाट होत असतांना मी मोबाईलवर बोलणार नाही अशी उपस्थितांनी शपथ घेतली.
कार्यशाळेत पोलीस, आरोग्य, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना व नागरिकांनी सहभाग घेतला. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन परिविक्षा अधिकारी श्री.प्रविणकुमार यांनी मानले.
आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
१३ ऑक्टोबर वेळ दुपारी ४ वाजताची. जिल्हाधिकारी कार्यालयाचे इमारतीत असलेल्या विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नेहमीप्रमाणेच आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त असतांना अचानक मेगा फोनवरुन सूचना करण्यात आली. ताबडतोब इमारत रिकामी करा, कुणीतरी बाँब ठेवला आहे. या एकाच भितीने सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपली कामे अर्धवट टाकून इमारतीतील वेगवेगळ्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील भागात एकत्र झाले. कुणालाच काही कळेना. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला होता. प्रत्येकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर लक्षात आले की जर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत अज्ञात व्यक्तीने बाँब ठेवला असेल तर काय उपाययोजना केली पाहिजे याचेच प्रात्यक्षिक जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
जर अशाप्रकारचे संकट वा आपत्ती आल्यास कशाप्रकारे दक्षता घेतली पाहिजे याबाबतची माहिती प्रात्यक्षिकातून देण्यात आली. बाँब शोधण्यासाठी बाँबशोध मोहिम राबविण्यात आली. बाँब सापडल्यानंतर त्याला निकामी कसे करायचे याबाबतची माहिती देण्यात आली. श्वान पथकाने बाँब ठेवलेल्या ठिकाणी सापडलेल्या कपड्यावरुन कुणाचा हा कपडा आहे हे गर्दीत उभ्या असलेल्या व्यक्तीला श्वानाने शोधून काढले.
इमारतीला आग लागल्यास कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवावे याचे प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. या आपत्ती निवारण प्रात्यक्षिकात पोलीस विभागाचे नितीन तोमर, रामकृष्ण अवचट, देविदास पडोळे, ओमराज जामकाटे, विजय लोनबळे, उमेश वानखेडे, मनोज वाढे, मनोज मेंढे, विनोद कल्लो, पंकज चंद्रिकापुरे, दिपक सांदेल, विक्की सोलंकी, जितेंद्र मिश्रा, अनिल हरिणखेडे, सचिन चव्हाण, श्वान पथकाचे यादव तुमरेटी, धर्मेंद्र मडावी, रामकृष्ण सरवर, शैलेंद्र शुक्ला, उमेश मारवाडे, महेंद्र ताराम, श्वान बृनो आणि राणा यांनी सहभाग घेतला. अदानी पॉवर प्रकल्प अग्नीशमन विभागाचे अर्जुन पटले, पंकज चौहान, लोकेश कटरे, निलेश फटींग, विक्रांत गजवी, अंगराज खैरकर, राजु बांडेबुचे यांचा सहभाग होता.
प्रात्यक्षिकाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसंरक्षक एस.युवराज, अदानी पॉवर प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सी.पी.साहू, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी मानले.