एमटीडीसीने पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे

0
11

गोंदिया,दि.१४ : गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात जैवविविधता आणि वन्यजीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे. अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे सुध्दा आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे. असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील पर्यटन स्थळांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार व सोनाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी.नौकरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, निसर्गप्रेमी डॉ.राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, एस.टी.आगार प्रमुख जयकुमार इंगोले, कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे, एमटीडिसीचे श्री.झंझाड, श्री.शिर्के, टूर्स एजन्सीचे शुभम अग्रवाल, अशोक मंत्री, ॲक्वा ॲडव्हेंचरचे सुरेश चौधरी, हितेश सव्वालाखे आदिची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.हेडे म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रचार-प्रसिध्दीचे काम करते. पर्यटन पर्वाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध पर्यटन व तीर्थक्षेत्राला पर्यटकांनी भेट दयावी. जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांना जिल्ह्यातील नागरिकांनी सुध्दा भेट दयावी. एमटीडीसीच्या माध्यमातून निवास, न्याहारी व महाभ्रमण आयोजित करण्यात येते. याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी नागपूर विभागातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी करण्यासाठी एमटीडीसीने तयार केलेल्या ऑडिओ जिंगल्सचे विमोचन केले. आभार जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भूत यांनी मानले.