गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या -ब़डोले

0
13

मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) ः गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोरागाव मतदार संघातील तब्बल चाळीस गावातील धानपिके झालेल्या वादळी पाऊसामुळे आणि अनियंत्रित रोगांमुळे उध्वस्त झालेली असल्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केल्याची माहिती त्यांनी दिली.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सदर निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे बडोले यांनी पत्राकारांना सांगितले.  दिनांक 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धानपिके उध्वस्त झाली. त्यानंतर सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार प्रमाणावर उभ्या असलेल्या धानपिकांवर तुडतुडा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. उष्ण व दमट हवामान तुडतुडा रोगाची झपाट्याने करण्यासाठी पोषक असल्यामुळे त्यावर कोणत्याही किटकनाशकाचा परिणाम होत नाही, त्यामुळे धानपिक शेतकरी संकटात पडला आहे, असे बडोले यांनी सांगितले.

अलिकडेच बडोले यांनी 22 ऑक्टोबर रोजी केलेल्या पाहणी दौऱ्यात तुडतुडा रोगासोबतच पेरवा, फंगीसाईट, रस शोषणारा तांबडा-पांढरा मावा, पाने कुरतडणारी अळी, त्रिफुली आदी रोगांचे प्रचंड आक्रमण होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अवकाळी पावसामुळे निसवलेल्या धानपिकांच्या ओंब्यात दाणे भरलेले नाहीत, त्यामुळे अपेक्षित धानाचे उत्पन्न निघणे शक्य नाही. धानपिकावरील किड कोणत्याही किटकनाशकामुळे नियंत्रणात येत नाही, अशावेळी हवालदिल शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने भक्कमपणे उभे राहाणे गरजेचे आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, याबाबत लेखी निवेदन दिल्याचेही बडोले म्हणाले.