पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे- राजकुमार बडोले

0
10

सिंचन प्रकल्पाचा आढावा
गोंदिया,दि.१४ : यंदा पाऊस कमी आल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून सिंचन व पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याचा आढावा पालकमंत्री बडोले यांनी १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, बाघ-इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात जो पाणीसाठा आहे त्याचे शेती आणि पिण्यासाठी योग्य नियोजन करावे. पाण्याच्या वितरणात मोठी गळती होत आहे. ही गळती बंद करणे आवश्यक आहे. कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. येत्या रब्बी व उन्हाळी हंगामात ज्या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देणे शक्य नाही अशा गावात दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना माहिती दयावी. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होणार नाही. असे ते म्हणाले.
पाऊस कमी आल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवावा असे सांगून श्री.बडोले म्हणाले, ज्या प्रकल्पातून गोंदिया शहरासाठी पाणीपुरवठा होवू शकतो त्यामधून पाणी घ्यावे. शेतकऱ्यांनी पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करावा. ज्या पाणी वापर संस्थांना पाणी मिळू शकेल त्यांना पुरेसे व योग्य प्रमाणात पाणी मिळेल याचे नियोजन करावे. हे नियोजन करतांना २५०० हेक्टर जमिनीला सिंचनाची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.आमदार पुराम म्हणाले, सिंचन विभागात योग्य समन्वय व नियोजन असल्याचे दिसून येत नाही. आवश्यकता नसतांना पाण्याचा अपव्यय या विभागाकडूनच होत आहे. देवरी तालुक्यात असलेल्या शिरपूर धरणातून १ महिना सतत पाणी सोडले. त्यामधून किती हेक्टर शेतीला पाणी सोडले याबाबतची माहिती संबंधित विभाग देवू शकला नाही. यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, यावर्षी रब्बीमध्ये धानासाठी पाणी देण्यात येणार नसल्यामुळे सिंचन विभागाने कालवे दुरुस्तीची कामे हाती घ्यावी. शेतातील बोअरवेलमधून देखील सिंचनासाठी पाण्याचा वापर करण्यात येवू नये अशा सूचना तातडीने संबंधित शेतकऱ्यांपर्यंत दयाव्यात. केवळ हरबरा पिकासाठी पाणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.छप्परघरे म्हणाले, इटियाडोह प्रकल्पात १०७ मिलीमीटर क्युबीक पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही. उपलब्ध पाणीसाठ्यावरुन जवळपास १२ पाणी वापर संस्थांना कालव्याद्वारे पाण्याची व्यवस्था सिंचनासाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.