अतिक्रमीत जागा मोकळ्या करा – पालकमंत्री बडोले

0
9

गोंदिया शहर अतिक्रमणाबाबत आढावा सभा
गोंदिया,दि.१४ : गोंदिया शहराच्या विकासात अतिक्रमण हा मोठा अडथळा आहे. हे शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे. नियोजनबध्द शहराचा विकास करायचा असेल तर शहरातील अतिक्रमीत जागा मोकळ्या झाल्या पाहिजे. यासाठी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने नगरपालिकेला सोबत घेवून तातडीने करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १३ नोव्हेंबर रोजी गोंदिया शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत आयोजित सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, जे अतिक्रमण नियमीत करण्याची आवश्यकता आहे ते प्रस्ताव तातडीने पाठवावे. रस्त्यात येणारे अतिक्रमण तातडीने काढण्याची कार्यवाही करावी. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे गोंदियावासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होईल याचे नियोजन करावे. सांडपाण्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व्हावे. शहरातील कचरा टाकण्यासाठी डम्पींग ग्राउंडचा प्रश्न निकाली काढावा. शहरातील मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण व्हावी. शहरात पार्कींगची व्यवस्था सुध्दा करावी. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी काळे म्हणाले, अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमीत जागांचे मार्कींग करुन देण्यात येईल. कोणता भाग अतिक्रमीत आहे, हे ठरविण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचा सर्वेअर उपलब्ध करुन देण्यात येईल. असे ते म्हणाले.
डॉ.भूजबळ म्हणाले, वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात पार्कींगची अडचण निर्माण झाली आहे. वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांसाठी योग्य ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात येईल. गोंदियात पाच ठिकाणी पार्कींग झोन तयार करण्यात येतील. पे ॲन्ड पार्कची व्यवस्था सुध्दा करण्यात येईल. त्यामुळे पार्कींगची अडचण येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री.इंगळे म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. शहराच्या विकासात अतिक्रमण हे अडथळा ठरले आहे. शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. श्री.पाटील यांनी अतिक्रमीत जागांची मार्कींग करुन मिळावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.