युवावर्गाने देशसेवेसाठी पुढे यावे – राजकुमार बडोले

0
16

गोंगले येथे सुरक्षा दौड
सडक अर्जुनी,दि.२० : आदिवासी व ग्रामीण भागातील मुले शारिरीकदृष्ट्या अत्यंत काटक असतात. मैदानी खेळात देखील ते सरस असतात. आदिवासी मुले नक्षल प्रवाहात न जाता विकासाच्या प्रवाहात यावी यासाठी पोलीस विभाग व प्रशासन तत्पर आहे. युवावर्गाने मैदानी खेळात आपले कौशल्य दाखवून पोलीस व सैन्य भरतीत सहभागी होवून देशसेवेसाठी पुढे यावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथे १९ नोव्हेंबर रोजी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमधील करिअर घडविण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जि.प.सदस्य शिला चव्हाण, पं.स.सदस्य प्रमिला भोयर,सरपंच डि.यु.रहांगडाले,उपअभियंता सुनिल तरोणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, सांख्यिकी अधिकारी तुलसीदास झंझाड, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे,  माजी सरपंच श्री.रहांगडाले, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते उपस्थित होते.
डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. नक्षलविरोधी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा क्षेत्रात चांगले करिअर घडावे यासाठी सुरक्षा दौड आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय दौड स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यशस्वी ठरणाऱ्या मुला-मुलींना प्रशिक्षणासाठी नागपूर, पुणे, अमरावती येथे पाठविण्यात येईल. पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र गोंगले येथे स्थापन करण्यात येणार असून या भागातील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. जीवनात काहीतरी करायचे आहे या प्रेरणेतून दौडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरपंच श्री.रहांगडाले म्हणाले, या भागातील मुला-मुलींचे करिअर घडविण्याचे स्वप्न पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु झाल्यानंतर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. गावातील बेरोजगार युवक-युवती यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावी अंमलबजावणी करुन गावाच्या विकासाला गती देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी मुला-मुलींच्या १०० मीटर, ३०० मीटर, ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विजय बिसेन यांनी मानले.