नागपूर पेरी अर्बन व वाडी नगर परिषद पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी – बबनराव लोणीकर

0
16

मुंबई, दि. 20 : नागपूर पेरी अर्बन व वाडी नगर परिषद, जिल्हा नागपूर येथील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.नागपूर पेरी अर्बन व वाडी नगर परिषद पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्याबाबत तसेच राज्यातील पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना शेती पंप दराने वीज पुरवठा करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री.लोणीकर बोलत होते.
श्री. लोणीकर पुढे म्हणाले, नागपूर पेरी अर्बन व वाडी नगर परिषद, या योजनेत सर्व वाडी-वस्ती समाविष्ठ होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी पुरवठा विभागामार्फत तसेच नागपूर जिल्हा डीपीसीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना शेती पंप दराने वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी श्री.लोणीकर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली. तसेच जालना जिल्ह्यातील आष्टी, सेवली येथे कमी दाबाचा विद्युत प्रवाह असल्यामुळे या ठिकाणी 132 के.व्ही. इतका विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
ऊर्जामंत्री श्री.बावनकुळे यांनी औरंगाबाद व जालना क्षेत्रातील विद्युत पारेषण व वितरण अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करुन जालना जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्या बाबतच्या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. नागपूर पेरी अर्बनच्या पाणी पुरवठा योजनेत एकही व्यक्ती वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त योजना तयार करावी, अशा सूचना दिल्या.या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.