वाचन संस्कृती वाढविण्यात वाचकांची भूमिका महत्वाची- डॉ.दिलीप पाटील-भूजबळ

0
43

गोंदिया ग्रंथोत्सव-२०१७ चे उदघाटन
गोंदिया,दि.२९ : आज वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. तिचा ऱ्हास होतो की काय अशी भिती वाटत आहे. सोशल मिडियाचा वापर आज मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रंथ हेच गुरु असल्यामुळे वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने वाचनालयाच्या बजाज सभागृहात २९ नोव्हेंबर रोजी आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-२०१७ चे उदघाटन करतांना डॉ.भूजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोलीच्या बहिनाबाई अंजनाबाई खुणे, ज्येष्ठ कवी साहित्यिक युवराज गंगाराम, प्रा.डॉ.सविता बेदरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिव शर्मा, श्री शारदा वाचनालयाचे सचिव जगदिश मिश्रा, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह डी.डी.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
नव्या पिढीला प्रेरणा देणारे अनेक पुस्तके आज बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या पुस्तकांचे वाचन नव्या पिढीने केले पाहिजे. मराठी साहित्य समृध्द आहे, या साहित्याचे वाचन झाले पाहिजे. समाजात असलेले वेगवेगळे विचारप्रवाह हे समाज सुधारणेसाठी एकत्र आले पाहिजे. ग्रंथाचे भांडार हे वैभव आहे. या वैभवापासून कोणीही वंचित नसावे. थोरामोठ्यांचे विचार ग्रंथातून लोकांपर्यंत गेले पाहिजे. भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या संविधानामुळे विविधतेने नटलेला आपला देश शक्तीशाली बनला आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथ वाचण्यामुळे ज्ञान प्राप्ती होते. दररोज वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. अनेक पुस्तके ही नव्या पिढ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. वाचनाची सवय वाढली पाहिजे. वाचन हे प्रगतीचे लक्षण आहे. जिल्ह्यात असलेल्या अनेक ग्रंथालयात चांगली पुस्तके उपलब्ध आहेत, त्याचे वाचन झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
श्रीमती कांबळे म्हणाल्या, वाचन चळवळ ही वाढली पाहिजे. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून झाला आहे. वाचनामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व निर्माण होते. वाचन हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ते इतरांनाही सांगितले पाहिजे. समाजात चांगले विचार रुजण्यासाठी ग्रंथांची भूमिका महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचनाचा छंद जास्तीत जास्त जोपासला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
श्री.सोसे म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांमध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथ हे आपले मित्र आहे. अनेक ग्रंथ हे आपल्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. जास्तीत जास्त वाचनामुळे विचारसरणी प्रगल्भ होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व अंजनाबाई खुणे यांनीही विचार व्यक्त केले.
प्रारंभी डॉ.भूजबळ यांनी शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार विभागाच्या स्टॉलचे फित कापून उदघाटन केले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी केले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी तर उपस्थितांचे आभार शिव शर्मा यांनी मानले.