भंडार्यात निघाला हलबांचा मोर्चा

0
14

भंडारा दि.१०: ना तोरोसाठी, ना मोरोसाठी फक्त आपलो समाजसाठी सगळाजण पार्टी (पक्ष) सोडकुन्या एकत्र आबन. सगळाजण एक होयकुन्या समाज की लढाई लढबन असे आवाहन करीत आदिवासी हलबा समाजाचा निघालेल्या मोर्चानंतर नेतृत्व करणाºयांनी समाजाला एकसंघ होण्याचे आवाहन केले.हलबा समाजाचा मोर्चा शनिवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी समाज बांधवांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा व एकसंघ होऊन समाजाची लढाई लढा, असा संदेश दिला.
शहरातील चांदणी चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हातमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय दलाल, डॉ.अनिल धकाते, आदिम कृती समितीचे आशिष पात्रे, नगरसेवक नितीन धकाते, आदिम कृती समितीचे मनोहर हेडाऊ, हलबा महासंघाचे दुर्वास धार्मिक, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, मोहाडीच्या नगराध्यक्ष स्वाती निमजे, राजू हेडाऊ, खुशाल निमजे, यशवंत सोनकुसरे, बंडू बारापात्रे आदींनी केले.यावेळी नितीन धकाते, धनंजय दलाल, दुर्वास धार्मिक, स्वाती निमजे, जया सोनकुसरे, डॉ. अनिल धकाते आदी समाज बांधवांनी मोर्चेकरांना संबोधीत केले. यावेळी त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून समाजासाठी एक होण्याचे आवाहन केले. या मोर्चाला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी पाठिंबा दर्शवित ते हलबा समाजाच्या आजच्या मोर्चात सहभागी झाले होते.
राज्य शासनाने स्वत:च्या विशेषाधिकाराचा वापर करून हलबा समाज बांधवांवर कारवाई करू नये, जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे संपुष्टात आणण्यात आली आहे. हलबा, हलबी जमातीचे प्रमाणपत्र देताना १९५० च्या आधीचे पुरावे मागण्याचे आग्रह करू नये असे आदेश काढावे, समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले हलबा-हलबी जमात पडताळणी प्रकरण शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत काढू नये, सर्व समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आदी मागण्यांना घेवून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोर्चेकरांनी कोष्टी भाषेतच भाषण करून समाजबांधवांना मार्गदर्शन केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता