सालेकसा नगरपंचायतीकरीता ८९ टक्के मतदान

0
5
गोंदिया,दि.१३- जिल्ह्यातील सालेकसा नगरपचांयतीच्या १७ प्रभागाकरीता आज बुधवारला झालेल्या निवडणुकीत ८९.६५ टक्के मतदान झाले आहे.येथे निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.उद्या गुरुवारला मतमोजणी होणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.२७१६ मतदारापैकी २४३५ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात होते. प्रथम नगराध्यक्ष बनण्याचा बहुमन येथे अनुसूचित जमातीला मिळणार असून यासाठी भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवाय दोन्ही पक्षाचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे हे बंडखोर कोणाचे गणित बिघडवतात हे बघावे लागेल. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी हलबीटोला येथील किशोर गावराने यांना उमेदवारी दिली आहे. परंतु भाजपचेच विरेंद्र उईके सुरुवातीपासून प्रबळ दावेदार होते व शेवटी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत टोपली हातात घेतली आहे.
काँग्रेसनेही हलबीटोला येथील श्यामकला सुभाष प्रधान याना उमेदवारी दिली तर काँगे्रेसच्या सुनंदा मनोहर उईके यांनी बंडखोरी करीत टेबल निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जांभळी येथील विनोद मडावी हे रिगंणात आहेत.
सालेकसा नगर पंचायतीत एकूण ५ गावांचा समावेश असून नगर पंचायत पूर्णपणे ग्रामीण परिसरात आहे. यात मुरुटोलाटोला मुख्य मार्गावर असून बाकलसर्रा, जांभळी, सालेकसा(जुना) हलबीटोला ही गावे जंगल परिसरात व तालुका मुख्यालयापासून दूर आहेत.प्रभाग निहाय उमेदवारांची संख्या बघितली तर प्रभाग क्रमांक १, ६, १५ आणि १६ मध्ये प्रत्येकी फक्त २ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रभाग क्र.१ आणि ६ मध्ये भाजपचा उमेदवार नसून बंडखोर उभे आहेत. प्रभाग क्रमांक २, ३,४,५,८,१२,१४ आणि १७ मध्ये प्रत्येकी ४ उमेदवार मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक ७,९ आणि १३ मध्ये प्रत्येकी ३ तर प्रभाग क्रमांक १० आणि ११ मध्ये प्रत्येकी ५ उमेदवार मैदानात आहेत.