मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाण्याचे भूमिपूजन

0
12

नागपूर,दि.23ः- देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाणे आणि निवासी तसेच व्यावसयिक संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते आज शनिवारी झाले. त्यानिमित्ताने लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लकडगंज पोलीस ठाणे सर्वाधिक स्मार्ट होणार आहे, मात्र येथील कामही स्मार्ट व्हायला पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी मनुष्यबळातही चांगल्यात चांगली कामगिरी बजावू शकतो, याची प्रचिती नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्तातून मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील विविध ठिकाणांहून येथे बंदोबस्तासाठी पोलीस बोलविण्यात येत होते. मात्र, यंदा तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस आयुक्तांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत बंदोबस्ताला ३८ टक्के मनुष्यबळ कमी वापरले. या आणि अन्य काही उपक्रमांच्या माध्यमातून नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित केल्याबद्दल तसेच अनेक चांगले उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले.

पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांच्या घर उभारणीसाठी अडीचपट एसएफआय वाढवून देऊ आणि वेतनाच्या बेसिकच्या २०० पट व्याजमुक्त कर्ज देण्यात येईल, असेही ते म्हणाले. सरकार हे करीत आहे. मात्र, पोलिसांनीही त्यांच्या कामात गुणात्मक दर्जा वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रारंभी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी वर्षभरात नागपूर पोलिसांनी राबविलेल्या समाजाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक करताना आ. खोपडे यांनी आपल्या मतदार संघात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.  या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी विशेष योगदान देणारे श्याम वर्धने (नासुप्रचे तत्कालीन सभापती), अभियंता सुनील गुज्जलवार आणि तंत्रज्ञ तौफिक सिद्दीकी यांचा कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे रंगतदार संचालन पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले.आभारप्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंडे यांनी केले.
पाच एकरात ११ माळ्यांचे बांधकाम. पोलीस ठाणे, सहायक आयुक्त आणि उपायुक्तांचे कार्यालय. संपूर्ण परिसरात वायफाय. पोलीस कर्मचारी, उपनिरीक्षक आणि निरीक्षकांचे निवासी संकुल. व्यावसायिक गाळेही बांधणार. क्लब हाऊस, जीम आणि आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाचीही व्यवस्था. ५०० लोकांची क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल. पहिले तीन माळे पार्किंगसाठी. बांधकामासाठी १०८ कोटींचा निधी तर कार्यालय फर्निचर आणि अन्य सुविधांसाठी ३६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर.