तिरोड्यात काढली शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

0
12

गोंदिया,दि.२४ः:-तिरोडा तालुका शेतकरी सेवा समितीतर्फे शुक्रवारी (दि.२२) रोजी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.सदर आंदोलन शेतकरी समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले, भरत रहांगडाले, शिशुपाल पटले, सेवा सहकारी अध्यक्ष गणराज पटले, हेमराज बिसेन, मनोहर हरिणखेडे, सहेषराम पटले, सुरेश पटले, अशोक टेंभरे, विजय क्षीरसागर, मुन्ना हरिणखेडे, धमेंद्र कटरे, जयेश हरिणखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, यासह विविध मागण्यांकरिता शासनाला वांरवार निवेदन देण्यात आले. मात्र यावर शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्याने शेतकरी सेवा समितीने शुक्रवारी तिरोडा शहरात राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविला. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून शेतकरी हवालदिल आहे. कर्जमाफी, धानाला भाव, जी.एसटी, सीएसटी, बेरोजगारी दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारीे यांना देण्यात आले. निवेदनातून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा, शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची मदत करा, पिक विम्याची रक्कम त्वरीत देण्यात यावी, बारमाही पाण्याची सोय करा, कोणतीही अट लावता सरकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आदी मागण्यांचा त्यात समावेश होता.