जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी १५ कोटीचा निधी

0
18
OLYMPUS DIGITAL CAMERA

गोंदिया,दि.11 : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासासाठी १५ कोटी रु पयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन विकासाची विविध विकास कामे करण्यात येणार आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
शासन निर्णयात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाठी ४ कोटी ९४ लाख ५ हजार रु पये, प्रतापगड तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी ४ कोटी ८८ लाख ४३ हजार रूपये, नागझिरा (मुरदोली) पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ४ कोटी ८९ लाख रुपये आणि बोदलकसा येथे १२५ केव्हीए जनीत्र संच व विद्युतीकरणासाठी १२ लाख ८८ हजार असे एकूण १४ कोटी ८४ लाख ३५ हजार रूपये मंजूर केले आहे.
पर्यटन विकासाच्या कामाला त्वरीत सुरूवात व्हावी यासाठी तातडीने ५० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. मंजूर निधीतून नवेगावबांध येथे प्रवेशद्वार, सरंक्षण भिंत, इंटरक्षण हॉल, सार्वजनिक प्रसाधनगृह, वाहनतळ, नैसर्गिक ट्रेल, १.१५ किमी. रस्त्याची दुरूस्ती, १.८५ किमी. नवीन रस्ता निर्मिती, लॉन, पाथवे, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, इनफॉर्मल सेटींग असे अनेक कार्य करण्यात येणार आहे.प्रतापगड येथे प्रसाधनगृह, उपहारगृह, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व सिक्युरीटी कॅबीन, लॉन, गार्डन, जमीन विकास, वाहनतळ, पदपथ,पाणी पुरवठा पाईप लाईन, पोहच रस्ता, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण, ४ हायमास्ट लाईट आदी विकास कामे करण्यात येणार आहे.
नागझिरा येथे इंटरप्रिटेशन सेंटर, रेस्टॉरेंट, दोन पर्यटन कक्ष, इनफॉर्मल सेटींग, संरक्षण भींत, सिक्युरिटी कॅबीन, प्रवेशद्वार, लॉन डेव्हलपमेंट, बंधारा, लॉन, वाहनतळ, पाथवे, पोहच रस्ता, नैसिर्गक ट्रेल, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण आदी कामे केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.