राज्यघटनेला अभिप्रेत शेवटच्या घटकालाही न्याय देऊ- न्या.भूषण गवई

0
10

जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमीपूजन

गोंदिया,दि.१2 : भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. लोकशाहीत लोकांना जे हक्क दिले आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास वृध्दींगत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांनी केले.
जिल्हा न्यायालय परिसरात ११ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत नविन इमारतीचे भूमीपूजन न्या.गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्या.मुरलीधर गिरटकर व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर होते.
न्या.गवई पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने राज्यघटना तयार केली आहे. राज्यघटना ही समानतेवर आधारीत आहे. कायदयापुढे सर्व समान आहे. जे मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचे काम राज्यघटनेला अभिप्रेत आहे. न्यायिक अधिकारी व वकील ही न्याय व्यवस्थेची चाके आहेत. दोघांनी एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय न्यायदानाचे काम पूर्ण होवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी समानता कबुल केली आहे. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. विरोधाभास जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत सामाजिक व आर्थिक समानता निर्माण होणार नाही हे डॉ.आंबेडकरांनी सांगितले आहे. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
आज आनंदाचा क्षण असल्याचे सांगून न्या.गवई म्हणाले, गोंदिया वकील संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. याची सुरुवात आजपासून आपण करीत आहोत. गोंदिया वकील संघाला मोठी परंपरा लाभली आहे. न्या.वायकर, न्या.वझे, न्या.अमरजितसिंह बग्गा, न्या.टहलानी, न्या.स्वप्ना जोशी हे गोंदियाचे आहेत. न्यायमुर्ती सर्वश्री बग्गा, टहलानी आणि श्रीमती जोशी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगून न्या.गवई पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्याने मोठे वकील, न्यायाधीश दिले आहे. ज्यांनी गोंदिया बार असोशिएशनला नावारुपास आणले असल्याचे ते म्हणाले.
न्या.गवई पुढे म्हणाले, शताब्दी वर्षापासून या वकील व न्यायाधीशांची प्रेरणा घेवून आपले कार्य आणखी चांगल्या प्रकारे करणे अपेक्षीत आहे. जिल्हा बार असोशिएशनचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे. शताब्दी वर्षात चांगले कार्य बार असोशिएशनच्या हातून घडतील आणि चांगले वकील व न्यायाधीश निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्या.गिरटकर म्हणाले, जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण होणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा या इमारतीत उपलब्ध राहणार आहे. जिल्ह्याच्या न्यायालयीन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन इमारती व व्यवस्थेच्या बाबतीत जिल्हा मागे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
न्या.कोठेकर म्हणाले, विस्तारीत इमारत पाच मजली असणार आहे. यावर २३ कोटी रुपये खर्च होणार आहे. इमारत पुर्ण होताच न्यायालयात प्रलंबीत असलेली व पुढे येणारी प्रकरणे यांचा वेगाने निपटारा होण्यास मदत होईल. प्रलंबीत प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी न्यायिक अधिकारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.कटरे म्हणाले, न्यायालयीन कामकाज सोयीचे व्हावे यासाठी विस्तारीत इमारतीची गरज होती. पालक न्यायाधीश म्हणून न्या.गिरटकर यांनी विस्तारीत इमारतीला जागा उपलब्ध व्हावी तसेच तिचे बांधकाम लवकर व्हावे यासाठी पुढाकार घेतला. न्यायालयीन प्रक्रिया ही भारतीय व्यवस्थेत उच्च मानली जाते. भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमीपूजन कोनशिलेचे अनावरण करुन केले. न्या.गवई यांचा परिचय न्या.त्रिवेदी यांनी तर न्या.गिरटकर यांचा परिचय न्या.श्रीमती आनंद यांनी करुन दिला. जिल्हा वकील संघाच्या वतीने न्या.गवई यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून तसेच जिल्ह्यातील सर्व वकील संघाच्या वतीने देखील न्या.गवई यांचे स्वागत करण्यात आले. तसेच न्या.गिरटकर यांचे देखील स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन बोरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रबंधक श्री.चांदेकर, नागपूर खंडपिठाचे उपप्रबंधक आशिष आवारी यांचेसह न्यायिक अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा व तालुका वकील संघाचे पदाधिकारी, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संचालन न्या.नितीन ढोके व ॲड.ओम मेठी यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार न्या.श्रीमती इशरत शेख यांनी मानले.कार्यक्रमासाठी अ‍ॅड. वसंत चुटे, अ‍ॅड. पुरुषोत्तम आगाशे, अ‍ॅड. सुनिता पिंचा, अ‍ॅड. कृष्णा पारधी, अ‍ॅड. सचिन बंसोड,अॅड.पी.सी.चव्हाण,अॅड.अर्चना नंदघडे, अ‍ॅड. प्रकाश तोलानी व इतरांनी सहकार्य केले.