रुग्णालय कर्मचार्‍यांच निवासस्थान झाले प्रेमीयुगुलांचा अड्डा

0
24
जितेंद्र ढोरे/लाखांदुर,दि.१७ःः —तालुक्यातील नागरिकांना आरोग्याची चांगली सेवा मिळावी म्हणून ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. “शासनाने करोडो रुपये खर्च करून लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी निवासस्थानाचे बांधकाम केले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण करून निवासस्थानामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे सदर निवासस्थानामध्ये कुणीही राहत नसल्याने निवासस्थानामधील खोल्यामध्ये वापरण्यात आलेले निरोध, लेडीज चप्पल, बांगड्या आढळून आल्यामुळे हे ठिकाण प्रेमीयुगुलांचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे. तसेच काही खोल्यांमध्ये व निवासस्थान परिसरात रिकाम्या दारूच्या बॉटल आढळून आल्याने सदर निवास्थाने हे प्रेमीयुगुलांचा व दारूड्यांचा अड्डा बनला आहे.”
लाखांदुर येथील रुग्णालयातील कर्मचार्‍यांना कर्तव्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांना चांगली आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून शासनाच्यावतीने १९९७ मध्ये कर्मचार्‍यांच्या निवास्थानास मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर निवास्थानाचे बांधकाम करण्यात आले. सदर निवास्थानांचे बांधकाम पूर्ण होऊन १९ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र या निवास्थानामध्ये पाण्याची सोय अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच इलेक्ट्रीक फिटिंगचे कामही अपूर्ण आहे. निवास्थानांचे अनेक किरकोळ काम अद्यापही शिल्लक आहे. १९ वर्षाचा कालावधी लोटूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून, सद्यास्थितीत ह्या निवास स्थानाला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कर्मचार्‍यांना भाड्याच्या खोलीत राहून रुग्णालयात सेवा बजावावी लागत आहे.
निवास्थानातील अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्यात येऊन, दुरावस्था झालेल्या साहीत्याची दुरूस्ती करावी यासाठी लाखांदुर ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामीण रुग्णालयाच्या पत्रांना केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. शासनाने कर्मचार्‍यांना निवासाची सोय व्हावी म्हणून करोडो रूपये खर्च करून निवास्थानाचे बांधकाम केले. मात्र, सदर निवास्थानाचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे भंगारवस्थेत असून रुग्णालयातील कर्मचार्‍यांना भाड्याच्या खोलीत राहावे लागत आहे. यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बुडत आहे.
प्रशासनाने याबाबीची दखल घेऊन लाखांदुर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानामध्ये तत्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून निवासस्थाने कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.