आत्मसन्मान व मूलभूत गरजांच्या लढ्यात पुढे या-मेवानी

0
12

गोंदिया,दि.01 : खायला अन्न नसेल व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा भागत नसतील तर अस्मिता व आत्मसन्मानाचे काय करणार. तसेच या सोयी ज्यांना मिळत असतील व आत्मसन्मान नसेल तरीही याचा फायदा काय. करिता जाती अंत व समानतेच्या लढ्यात आपले मूलभूत प्रश्न एकत्रित करून आत्मसन्मान व मूलभूत गरजांच्या लढ्यात आंबेडकरी युवकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन गुजरातचे अपक्ष आमदार व दलित चळवळीचे तरूण नेते जिग्नेश मेवानी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व रिपब्लिकन युथ फेडरेशन यांच्या संयुक्तवतीने बुद्ध जयंतीनिमित्त भीमनगर येथील बौद्धविहाराच्या मैदानात मंगळवारी (दि.२९) आयोजीत सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी विचारवंत रमेश जीवने, संजय भास्कर, अमित भालेराव, मिलिंद गणवीर, सतीष बंसोड, सुनील आवळे, अनील सुखदेवे, निलेश देशभ्रतार, निलेश कांबळे उपस्थित होते. पुढे बोलताना मेवानी यांनी, दलीत हक्कांकरिता व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविणारे तरूण तुरूंगात पाठविले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने चळवळीचे तरूण कार्यकर्ते चंद्रशेखर राव यांना रासुका अंतर्गत तुरूंगात डांबून ठेवले असून त्यांना आजाद करण्याचा लढा करा असे सांगीतले.
याप्रसंगी जीवने यांनी, बौद्ध धम्माचा लग्न कायदा बनविण्याच्या मागणी संदर्भात महाराष्ट्रात निर्णय घेण्याची चुकीची परंपरा सुरू आहे. जे लोक बौद्ध विवाह कायदा सांगतात ते बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी देवा रूसे, सुशिल ठवरे, श्याम चौरे, लक्ष्मीकांत डहाटे, राजेश भोयर, रंजीत बंसोड, अरविंद नागदेवे, सुर्यकांत डोंगरे, स्वप्नील नंदागवळी, वेदांत गजभिये, नरेश मेश्राम, निशांत भालेराव, फिरोज कुरेशी, विक्रम भालेराव, अमोल नकाशे, बंटी डोंगरे, संजय चौरे, प्रशांत डोंगरे, ज्ञानीराम फरकुंडे, सुरेंद्र खोब्रागडे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.