एका सातबार्‍यावर केवळ एक बियाण्याची बॅग !

0
8

गोंदिया,दि.15ः-शेतकर्‍यांना खरीप हंगामाकरीता पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु, जिल्ह्यात शासनाच्या आदेशाला तिलांजली देत एक सातबारा उतार्‍यावर १0 ते २५ किलो वजनाची एकच शासन अनुदानाची बियाण्याची बॅग दिली जात असल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. त्यामुळे २ ते ४ किवा त्यापेक्षा जास्त शेतजमिन असलेल्या शेतकर्‍यांवर खासगी व्यापार्‍यांकडून बियाणांची एमआरपी किमत मोजून बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी खरीपात झालेला अत्यल्प पाऊस तसेच अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील धानपिकांचे मोठे नुकसान झाले. तर अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन जलसाठय़ाची उपलब्धता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे उन्हाळी धान पिक न घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वत:चे 0सचनाचे साधन होते त्यांनी उन्हाळी धानपिक घेतले. परंतु, ज्यांच्याकडे सिचनस्त्रोत उपलब्ध नव्हते ते उन्हाळी धान पीक घेऊ शकले नाही. त्यामुळे गेले दोन्ही हंगामात पाहिजे त्या प्रमाणात धानाचे उत्पादनच झाले नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.
यादरम्यान, शासनाने शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर करून खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहे. असे असले तरी या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसत आहे. एक सातबारा उतार्‍यावर १0 ते २५ किलो वजनाची केवळ एकच अनुदानाच्या बियाणाची बॅग उपलब्ध होत असल्याने अधिकची बियाणे ही शेतकर्‍यांना पूर्ण रक्कम देऊन खासगी व्यापार्‍यांकडून खरेदी करण्याची वेळ आली आहे. एक एकरात साधारणत: २५ किलो वजनाच्या बियानातून धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु जिल्ह्यात २ ते ५ एकर जमीन असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठी असून, या शेतकर्‍यांना अधिकचे बियाणे खासगी व्यापार्‍यांकडून खरेदी करावे लागणार आहे. या प्रकाराबद्दल शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून शासन आदेशाप्रमाणे अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.