पोलिस निगराणीत रेतीचे १९ ट्रक पसार

0
9

पवनी,दि.15ः-येथून १0 कि. मी. अंतरवर असलेल्या निलज फाटा येथील संजिवणी ढाबा परिसरात उभ्या असलेल्या अवैध रेती भरलेल्या ट्रकांना पवनी तहसीलदारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन करून तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांच्या निगराणीत ट्रकचालक ट्रक घेऊन पसार होण्यास यशस्वी झाले. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पवनी तालुक्याच्या सिमेला लागून असलेल्या भिवापूर येथे मंगळवारी (ता.१२) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तहसीलदार पाहणी करीत असल्याचे रेतीमाफीयांना माहिती मिळाली. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणारे १९ ट्रक पवनी तालुक्याच्या हद्दीतील निलज फाटा येथील संजीवणी ढाब्यासमोर उभे करण्यात आले होते. यावेळी पवनीचे तहसीलदार गजानन कोकड्डे यांना माहिती मिळताच कर्मचार्‍यांना घेऊन सायंकाळी ७ वाजता रेतीने भरलेले ट्रकांची माहिती तेथील आजूबाजुच्या संशयितांना विचारली असता कुठलीही माहिती नसल्याचे आढळून आले. तसेच ट्रकजवळ एकही चालक व क्लिनर दिसून न आल्याने १९ ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निश्‍चित झाल्याने तलाठी ईप्पर, पाटील, कुरकुटे, सव्वालाखे, सहदेव यांचेसोबत पंचनामा करून पवनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी ७.३0 वाजता घटनास्थळी पोहोचले. दरम्यान तहसीलदार व पोलिस पथक १0 वाजतापर्यंत ट्रकजवळ असेपर्यंत कोणीही ट्रकमालक व चालक तिथे फिरकला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी ट्रक पोलिसांच्या स्वाधीन करून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार करून घटनास्थळावर पोलिस तैनात करूनही रेती वाहतूक करणारे ट्रक पसार झाले. त्यामुळे गैरव्यवहार तर झाला नसावा तसेच झाला असेल तर कुणी केला? अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत असून या प्रकरणी कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाचा ५0 लाखांचा महसूल बुडाला आहे.
अवैध रेती चोरी प्रकरणातील ट्रकमध्ये एमएच ४0/वाय१४२६, एमएच ४0/एके९३६५, एमएच ३१/सीक्यू५६७१, एमएच ३१/सीबी ७४७९, एमएच ३१/सीबी६४६, एमएच ४0/एके.१४९९, एमएच ४0/व्हीजी0६४४, एमएच ४0/बीजी४९९, एमएच ४९/एटी३९५९, एमएच ४0/बीजी९१९५, एमएच ४0/एके४४९९, एमएच ४0/वाय३६६४, एमएच ४0/बीजी0१३२, एमएच ४0/बीजी९१६५, एमएच ४0/बीजी४७९९, एमएच ४0/एके९१९५, एमएच ४0/एन६२७९, एमएच ४0/एके४५२५, एमएच ४९/एटी९१९५ अशा १९ ट्रकांचा समावेश आहे.