सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानकाच्या समस्या सोडवा-पालकमंत्री

0
42

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.२३ : अहेरी विधानसभा मतदारसंघात येणारा सिरोंचा बस डेपो व आलापल्ली बसस्थानक हे दोन्ही विषय मतदारसंघातील जनतेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत.याठिकाणी असलेल्या समस्या त्वरीत दूर करुन नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीत दिले.
अहेरीपासून सिरोंचा येतील अंतर 100 किमीच्या वर आहे. तसेच सिरोंचा जवळुनच तेलंगणा व छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.तर गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती ह्या तिन्ही नद्यांवर मोठे पूल होत असल्याने सिरोंचा वरून ह्या राज्यांना आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला सिरोंचा येते बस डेपो (आगार) करणे अत्यावश्यक आहे. तसेच आलापल्ली हे विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांच्या सोईसाठी ह्या ठिकाणी ही सुसज्ज बस स्थानकाची मागणी बरेच वर्षांपासून नागरिक करीत आहेत.जनतेची ही मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री आत्राम यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यात त्यांना यश आले असून सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानकाला मंजुरी दिली आहे.या कामांत जागा व इतर काही अडचणी आहेत त्या तात्काळ सोडवून हे दोन्ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.तसेच 1 महिन्यात आत पुन्हा या विषयावर काय कारवाई करण्यात आली त्याचा आढावा घेण्यात येईल असेही सांगितले. या बैठकीला राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, महसूल विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.