न्यायिक मागण्यांसाठी पेन्शनधारक रस्त्यावर

0
9

गोंदिया,दि.05 : न्यायिक मागण्यांसाठी गुरुवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्थानिक बम्लेश्वरी मंदिराजवळून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकाऱी हरिष धार्मिक यांना सादर केले.यावेळी के.एस.बंसतवानी,टी.आर.भाजीपाले,जी.पी.लिल्हारे,टी.आर.भेलाडे,एस.आर.मारवाड,डी.जी.रहागंडाले उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लाभ पेन्शन धारकांना देण्यात यावा. ईपीएफओच्या पेन्शनर विरोधी तसेच कोर्ट निर्णय विरोधी भूमिकेच्या विरोधात देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये पेन्शनरांचे दावे दाखल आहेत. ती सरकारसाठी चांगली गोष्ट नाही. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये निवृत्त पेन्शन धारकांनी जे योगदान दिले त्याच्याच भरवशावर आज देश महाशक्ती बनू पाहत आहे. परंतु अशाच पेन्शन धारकांवर सध्या उपाशी राहण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या मानधनात भरघोस वाढ केली जात आहे.
सर्व ईपीएस पेन्शनधारकांना किमान नऊ हजार रुपये महागाई भत्ता व पेन्शन देण्यात यावी. अंतर्गत वाढीसाठी त्वरित प्रयत्न करण्यात यावे. कमिटी क्र. १४७ अन्वये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दोन्ही प्रकारच्या कर्मचा-यांना भेदभाव न करता विना अट लागू करण्यात यावा. सर्वांच्या आरोग्यासाठी ईएसआय लागू करून ईएसआय व्यवस्था सक्षम करण्यात यावी. कम्युटेशन रक्कम पुनर्स्थापित करण्यासाठी सीबीटीचा जो पूर्वी दिलेला निर्णय लागू करण्यात यावा.
पेन्शन कम्युटेशन आणि आरओसी सुविधा पुनश्च लागू करण्यात यावी. पेन्शन धारकांना सुविध व्हावी म्हणून जीवन प्रमाणपत्रची कार्यवाही स्थानिक बँक खात्यांद्वारे करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केल्या.