इंधन दरवाढीच्या निषेधार्त तहसीलदारांना निवेदन

0
14

अर्जुनी मोरगाव,दि.28 : सध्या देशात दररोज घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलची वाढ होत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. महागाईची झळ देशातील सर्वसामान्यांना बसत आहे. तेव्हा शासनाने वाढत्या महागाईवर निर्बंध घालावे, या मागणीचे पंतप्रधानाचे नाव असलेले निवेदन भारिप बहुजन महासंघ तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार देशात दरदिवशी इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. विद्युत बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती वीज ग्राहकांवर अतिरिक्त भुर्दंड बसत आहे. सध्या देशात अनेक लोकांवर धाडी पडत असून त्यात शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात येत आहे. अनेक संघटनांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असून तोही जप्त करण्यात यावा, वरील सर्व मागण्यांवर शासनाने त्वरित निर्णय घेऊन इंधनाचे दर त्वरित कमी करून महागाईवर आळा घालावा, अशा आशयाचे निवेदन भारिप बहुजन महासंघातर्फे अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार गेडाम यांना सुपूर्द करण्यात आले. निवेदन देतेवेळी आय.एम. साखरे, सि.आर. मेश्राम, एस.आर. चवरे, आर.एन. रामटेके, संदीप नंदागवळी, गौतम रामटेके, अमोल जनबंधु, सुनीता मेश्राम, राहुल तागडे, गौरव गेडाम, गुलाब साखरे, नरेश रामटेके, मनोहर टेंभुर्णे, हर्षित लांडगे, रत्नदीप शेंडे व अनेक भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते..