रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

0
12
  • बागायती गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग पिकांचा समावेश
  • जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन  

वाशिम, दि. १५ : रब्बी हंगाम २०१८-१९ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती), हरभरा या पिकांना ही योजना लागू असून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. तसेच उन्हाळी भुईमुग पिकासाठी सुध्दा ही विमा योजना लागू राहणार असून या पिकाचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०१९ आहे.

गहू (बागायती) व हरभरा या पिकासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिकरित्या या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. गहू (बागायती) पिकासाठी प्रति हेक्टर ३३,००० रुपये विमा संरक्षित रक्कम राहणार असून याकरिता प्रति हेक्टर ४९५ रुपये विमा हप्ता राहील. हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २३,१०० रुपये असून शेतकऱ्यांना ३४६.५० रुपये प्रति हेक्टर विमा हप्ता राहणार आहे. उन्हाळी भुईमुग या पिकासाठी कारंजा तालुका वगळून इतर  सर्व तालुक्यांना ही योजना लागू आहे. या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ३६,००० रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ५४० रुपये प्रति हेक्टर आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र अथवा बँकेत विमा प्रस्ताव दाखल करावा. अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.