राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकाच दिवशी १३४९ प्रकरणे निकाली

0
11

वाशिम, दि. ११ : जिल्हा न्यायालयात ८ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकाच दिवसात १३४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निपटाऱ्याचा उच्चांक आहे.यावेळी बोलताना श्री. जटाळे म्हणाले, राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने मिटवावेत. प्रकरणे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाल्यास त्याचा पक्षकारांना फायदा होतो.

यावेळी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अजयकुमार बेरिया व पदाधिकारी, वकील उपस्थित होते.राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वाशिम जिल्ह्यात न्यायालयात प्रलंबित असलेली ७४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दाखलपूर्व ६०५ प्रकरणांचा निपटारा यावेळी करण्यात आल्याचे जिल्हा विधी प्राधिकरणमार्फत कळविण्यात आले आहे.