पाण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.10 : इटियाडोह धरणाचे पाणी झिरो मायनरअंतर्गत घेण्यात येणाऱ्या रब्बी पिकांपर्यत पोहोचविण्यात यावे, या मागणीसाठी धान उत्पादक शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना १० डिसेंबर रोजी निवेदन सादर केले.वडेगाव झिरो मायनरपर्यंत उन्हाळी पिके होणार या आशेने महालगाव व इटखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी कडधान्याची पिके घेतली नाही. मात्र, हंगाम कुणाची वाट बघत नसताना ऐनवेळी १४ पाणी वापर संस्थांमधून २ पाणी वापर संस्थांना वगळून अर्जुनी मोरगाव येथील बरडटोली मायनरपर्यंतच पाणी देऊन २१०० हेक्टर जागेतील उन्हाळी पिकाला पाणी देण्यात येईल, असे ठरविण्यात आल्याने वडेगाव झिरो मायनरअंतर्गत येणाऱ्या २००० हेक्टर शेतजमिनीला उन्हाळी पीक घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यावर्षी इटियाडोह धरणात ३३ फूट पाणी असतानाही वडेगाव झिरो मायनर वंचित ठेवण्याचे कारण काय? जर उन्हाळी पिकाला पाणी द्यायचे नव्हते तर पूर्वी का सांगण्यात आले नाही? असा सवाल शेतकरी विचारीत आहेत. उन्हाळी पीक घेणार म्हणून शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड केली नाही. यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या विरोधात एकतर वडेगाव झिरो मायनरपर्यंत उन्हाळी पिकासाठी पाणी द्या अन्यथा आमची झालेली नुकसान भरपाई द्या, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना केली आहे.

निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य किशोर तरोणे, जि.प.सदस्य लोकपाल गहाणे, योगेश नाकाडे, दीपक सोनवाने, किरण खुणे, मनोहर लंजे, अभिजित नाकाडे, योगेश खुणे, रवी खुणे, सतीश टेंभुर्णे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी निवेदन स्वीकारून येत्या तीन दिवसात पाटबंधारे विभागातील अधिकांऱ्यांशी संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे सांगितले..