ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0
9

वाशिम, दि. 20 : जिल्ह्यातील ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याकरिता गठीत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. उपस्थित सदस्यांनी ग्राहकांना विविध क्षेत्रात येणाऱ्या अडचणी, समस्या आणि ग्राहकांची होणारी फसवणूक या विषयावर चर्चा केली.

वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या समस्यांकडे वेळीच लक्ष देवून त्या सोडवाव्यात, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. जिल्ह्यात वाशिमसह अन्य काही ठिकाणी असलेल्या मॉलमध्ये ग्राहकांची वस्तू खरेदी करतांना आर्थिक लुट होते. तेव्हा वजनमापे विभागाने याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून ग्राहकांना न्याय मिळवून दयावा. वस्तूच्या पॅकींगवर तारखेचा उल्लेख राहत नसल्यामुळे ग्राहकांची फसवणूक मॉल चालक करीत आहे. कारंजासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हॉटेलमधून खाद्यपदार्थांची विक्री उघड्यावर होत असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले असून खाद्य पदार्थ झाकून किंवा काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यास हॉटेल मालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाने बंधनकारक करावे. उघड्यावर विक्रीस प्रतिबंध करावा. हॉटेलमधील पिण्याचे पाणी तपासले जावे. शुध्द व स्वच्छ पाणी ग्राहकांना मिळणे हा त्यांच्या अधिकार असल्याची बाब सदस्यांनी लक्षात आणून दिली. वाशिम शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना लावलेले गतीरोधक तातडीने काढण्याची कार्यवाही नगर पालीकेने करावी. वाशिम शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे फॉगींग मशीनने फवारणी करावी अशी मागणी उपस्थित काही सदस्यांनी केली. यावेळी नगर परिषदेचे मुख्यधिकारी वसंत इंगोले यांनी सांगितले की, शहरात नियमितपणे फॉगींग मशीनने फवारणी करण्यात येत आहे. परवानगी नसलेले शहरातील विविध ठिकाणचे गतीरोधक काढण्याची कार्यवाही देखील लवकरच करण्यात येईल.

कारंजा आणि मंगरुळपीर शहरात उघड्यावर मास विक्री होत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून उघड्यावर मास विक्री बंद करण्याची मागणी सदस्याने केली असता नगर पालीका प्रशासनाला उघड्यावर मास विक्री बंद करण्याबाबतचे निर्देश देणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वानखेडे यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीने ग्राहकांना रिडींग प्रमाणेच देयक द्यावीत व ग्राहकांची फसवणूक थांबवावी असा मुद्दा यावेळी सदस्याने उपस्थित केला. ग्राहकांना देयके देतांना निश्चित काळजी घेतली जाईल असे कार्यकारी अभियंता श्री. तायडे यांनी सांगितले. बैठकीत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अग्रणी प्रबंधक दत्तात्रय निनावकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, मंगरुळपीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद धनकर, विद्युत निरीक्षक सारंग नाईक, सहायक पोलीस निरिक्षक विनायक जाधव,श्रीमती ए. सी. फुलझेले, भारत संचार निगमचे नारायण टेकाळे, बांधकाम विभागाचे अभियंता शांतीलाल अग्रवाल यांचेसह परिषदेचे अशासकीय सदस्य सर्वश्री सुधीर घोडचर, धनंजय जतकर, डॉ. एम. एम. बाहेती, गजानन साळी, भागवत कोल्हे, कृष्णा चौधरी, आनंद दायमा, नामदेव बोरचाटे, पी. बी. वानखेडे, विकास गवळी, रजनी गावडे, संजय राऊत, प्रसन्न पळसकर, अक्षय खेडकर, प्रा. विरेंद्रसिह ठाकूर यांची उपस्थिती होती.