वैज्ञानिक दृष्टी वाढविण्यासाठी वाचनाची आवश्यकता

0
10

गडचिरोली,दि.21ः ग्रंथ म्हणजे रचनांचा समुदाय, ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा भांडार, ग्रंथ म्हणजे स्वत:चा आरसा तसेच समाजाचे खरे मार्गदर्शक म्हणजे ग्रंथ होय. आयुष्य जगत असतांना वैज्ञानिक दृष्टी वाढविण्यासाठी वाचनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गडचिरोली तथा शिक्षण विभाग(माध्यमिक), जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव -२0१८ चे गुरुवारी उद््घाटन करण्यात आले. या त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, शिक्षणाधिकारी रमेश कुचे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, उपशिक्षणाधिकारी शरदचंद्र पाटील, उपशिक्षणाधिकारी चलाख, जगदिश म्हस्के, प्राचार्य मनीष शेट्ये प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना योगिता भांडेकर म्हणाल्या की, वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने शासन ग्रंथोत्सवाचे आयोजन करीत असते. या ग्रंथोत्सवात पुस्तक प्रदर्शनी तसेच ग्रंथ विक्रीचे स्टॉल याठिकाणी लावले जातात. खरा आनंद वाचनातच मिळत असतो. विद्यार्थ्यांनी, युवकांनी, नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनीला भेट देऊन ग्रंथ खरेदी करावेत, असेही आवाहन यावेळी केले. या ग्रंथ दिंडीत विविध शाळांची विद्यार्थी, लेझीम पथकासह, विविध पोशाखात सहभाग घेतला. सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली. कार्यक्रमाचे संचलन मोहन पराते आणि नंदिनी गडमवार यांनी केले तर आभार उमेश उचे यांनी मानले.